बुलडाणा : महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य अभियान व प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना एकत्रितरित्या राबविण्यात येते. या योजनेमुळे गरीब, गरजू लोकांना दुर्धर आजारांच्या उपचारांमध्ये मदत होत आहे. शस्त्रक्रीया असो, दुर्धर आजार असो.. मेंदूचा विकार असो किंवा पोटाचा आजार असो.. उपचारासाठी आता चिंता नाही. साध्या केशरी शिधापत्रिकेच्या पुराव्यावर या योजनांचा लाभ अंतिकृत रूग्णालयांमधून देण्यात येत आहे. त्यामुळे आर्थिक दुर्बल व्यक्तींना उचपारासाठी पैशांची चिंता नाही.. ही योजना त्यांच्यासाठी संजीवनीच ठरली आहे. जिल्ह्यात 1 एप्रिल 2020 पासून 31 डिसेंबर 2021 पर्यंत 31 हजार 314 रूग्णांनी या योजनांचा लाभ देण्यात आला आहे. या रूग्णांच्या उपचारापोटी शासनाने 74 कोटी 72 लक्ष 9 हजार 382 रूपयांचा खर्च उचलला आहे. सदर रक्कम उपचार घेतलेल्या अंगिकृत रूग्णालयांना शासनाने पाठविली आहे.
महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनंतर्गत 996 उपचारांचा लाभ देण्यात येत असून प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत 1209 उपचारांचा लाभ देण्यात येत आहे. या योजनांअंतर्गत उपचारासाठी केवळ शिधापत्रिका किंवा तहसीलदारांचा दाखला किंवा शासन मान्य छायाचित्र ओळखपत्र आवश्यक आहे. जिल्ह्यात 24 अंगिकृत रूग्णालयांमधून या योजनांचा लाभ देण्यात येत आहे. कोविड 19 साथरोगाच्या गंभीर अवस्थेतील रूग्णांना या योजनांमध्ये उपचाराचा लाभ मिळतो. कोविड काळात या योजनांमुळे अनेकांना उपचार मिळू शकले. या योजनांमधून आतापर्यंत 14 हजार 26 शेतकऱ्यांनासुद्धा उपचाराचा लाभ देण्यात आला आहे. यापोटी शासनाने 34 कोटी 66 लक्ष 31 हजार रूपये खर्च केले आहे. एकूण लाभार्थ्यांमध्ये 1749 रूग्णांनी हृदयरोगासाठी उपचार घेतले आहे. हृदयरोगावारील उपचारापोटी अंगिकृत रूग्णालयांना शासनाने 11 कोटी 89 लक्ष 35 हजार रूपये पाठविले आहे. एवढेच दुर्धर आजार असलेल्या कर्करोगावरील उपचारही योजनांमधून करण्यात येतात.
जिल्ह्यात आतापर्यंत 14 हजार 10 रूग्णांना कर्करोगावारील उपचाराचा लाभ देण्यात आला आहे. या योजनेतून अस्थिरोग शस्त्रक्रीयांचा लाभही देण्यात आला आहे. या लाभार्थ्यांची संख्या जिल्ह्यात 4348 असून यापोटी शासनाने 10 कोटी 31 लक्ष 51 हजार रूपये खर्च केले आहे. अनेक अपघातग्रस्त रूग्णांवर या अस्थिरोगावरील उपचार प्रकारातून लाभ देण्यात आला आहे. बाल रोगावरील उपचार घेणारे लाभार्थी जिल्ह्यात 2498 असून यापोटी शासनाने 6 कोटी 3 लक्ष 4 हजार रूपये खर्च उचलला आहे. जिल्ह्यात खारपाणपट्टा असल्यामुळे किडनीचे आजाराचे रूग्ण जळगांव जामोद, संग्रामपूर, शेगांव आदी तालुक्यात आढळतात. अशा रूग्णांना उपचाराचा खर्च डोईजड होतो. शासनाने या योजनांमधून किडनी आजाराकरीता उपचार सुरू केले आहे. जिल्ह्यात 3225 रूग्णांनी किडनीवरील आजाराचे उपचार केले असून यापोटी 4 कोटी 97 लक्ष 57 हजार रूपये खर्च झाला आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात 31 हजार 314 रूग्णांनी उपचाराचा लाभ घेतला आहे. योजनांमुळे अनेकांचे प्राण वाचले असून ही योजना खरोखर रूग्णांसाठी संजीवनी ठरली आहे. ही आहेत अंगीकृत रूग्णालये : जिल्हा सामान्य रुग्णालय बुलडाणा, अमृत हृदयालय बुलडाणा, सिटी हॉस्पीटल बुलडाणा, मेहेत्रे हॉस्पीटल बुलडाणा, संचेती हॉस्पीटल बुलडाणा, आस्था हॉस्पीटल मलकापूर, चोपडे हॉस्पीटल मलकापूर, कोलते हॉस्पीटल मलकापूर, मानस हॉस्पीटल मलकापूर, उपजिल्हा रूग्णालय मलकापूर, कोटारी हॉस्पीटल चिखली, तुळजाई हॉस्पीटल चिखली, धनवे हॉस्पीटल चिखली, मल्टीस्पेशालीटी हॉस्पीटल मेहकर, राठोड मल्टीस्पेशालीटी हॉस्पीटल मेहकर, सोनटक्के हॉस्पीटल खामागांव, साई हॉस्पीटल खामगांव, सामान्य रूग्णालय खामगांव, उपजिल्हा रूग्णालय शेगांव, माऊली डायलिसीस सेंटर शेगांव, ग्रामीण रूग्णालय वरवट बकाल ता. संग्रामपूर, ग्रामीण रूग्णालय जळगांव जामोद, ग्रामीण रूग्णालय दे. राजा व ग्रामीण रूग्णालय सिं.राजा.