गजानन डाबेराव ग्रामीण प्रतिनिधी नांदुरा
नांदुरा :- बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील टाकरखेड येथील मूळ निवासी व सद्या जळगाव येथे स्थायिक झालेले रविंद्रसिंह जालमसिंह जाधव निवृत्त राज्य महसूल आयुक्त नाशिक विभाग,निवृत्त राज्य माहिती आयुक्त अमरावती व पुणे विभाग,माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे सचिव यांचे दि.९ जुलै रोजी वयाच्या ६८ व्या वर्षी त्यांचे मूळ गावी टाकरखेड,ता:नांदुरा येथे सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. दि.९ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता जळगाव खान्देश येथील नेरी नाका स्मशानभूमीवर त्यांचेवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले .. टाकरखेड तालुका नांदुरा येथील जिल्हा परिषद शाळेतून शिक्षणाचा पाया रचलेले रविंद्रसिंह जाधव यांनी आय ए एस पर्यंतच्या प्रवासात अनेक प्रशासकीय जबाबदाऱ्या स्वीकारल्या होत्या.उपविभागीय अधिकारी पदापासून अमरावतीचे जिल्हाधिकारी,नाशिकचे महसूल आयुक्त,पुणे व अमरावती विभागाचे माहिती आयुक्त ते राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे सचिव पर्यंतचा त्याचा हा प्रवास राहिला आहे.शेतकरी कुटुंबात अतिशय हलाखीच्या परिस्थितीत त्यांनी जिद्द आणि कठोर मेहनतीतून शैक्षणिक प्रगती केली होती.काही वर्षांपूर्वी ते प्रशासकीय सेवेतून निवृत्त झाले असताना त्यांनी आपल्या मूळ गाव टाकरखेडची नाळ कायम ठेवली होती.दि.७ रोजी मलकापूर येथील लग्न कार्यक्रमानिमित्त ते गावाकडे आले असता टाकरखेड येथे आपल्या घरी मुक्कामी असताना दि.८ रोजी सकाळी त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला व त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.सुस्वभावी व्यक्तिमत्त्व असलेले रविंद्रसिंह जाधव यांच्या जाण्यामुळे महाराष्टातील प्रशासकीय सेवेची मोठी हानी झाली आहे.