नाशिक : इलाॅजिकल विनाेदाने, अंगविक्षेपाने आणि एकच गाेष्ट पुन्हा-पुन्हा वेगवेगळ्या पद्धतीने सांगताना रसिकांना हसू जरी येत असले तरी एकांकिकेचा ताणलेला दुसरा अंक आपण बघत आहे याचे भान रसिकांना हाेते आणि त्यामुळे नाटकाने मजा जरी आणली असली तरी नाट्यसेवा या संघाकडून अत्यंत दर्जेदार नाटकाची अपेक्षा असणाऱ्या प्रेक्षकांचा मात्र रसभंग झाला. ‘इशक का परछा’ हे एकांकिकासदृश नाटक दाेन अंकात बसविण्यासाठी बरीच कसरत केल्याचे स्पष्ट दिसत हाेते. अर्थात अभिनयासह तांत्रिक बाजू भक्कम असल्याने तसे नाटक अजूनही स्पर्धेत आहे असे म्हणायला हरकत नाही. ६१ व्या राज्य नाट्य स्पर्धेत नाट्यसेवा थिएटर्सने तिष्षा मुनवर लिखित आनंद जाधव, कृतार्थ कन्सारा दिग्दर्शित नाटक सादर केले. अनेकांच्या आयुष्यात येणारे प्रेमपत्र आणि त्या प्रेमाचा, पत्राचा हाेणारा शेवट अशी साधी प्रेमाची गाेष्ट या नाटकात गुंफलेली हाेती. नाटकातील आज्याच्या भूमिकेतील चेतन खाेकले आणि ऋषाच्या भूमिकेतील आर्यन जाधव यांनी नाटकात मजा आणली. दत्तूच्या भूमिकेतील किरण जायभावे यानेही प्रेमात पडलेला तरुण चांगला साकारला तर निशा, मीना, मास्तरची बायकाे, शिक्षिका अशा भूमिकांमधून माेनाली वाघमारे रसिकांच्या लक्षात राहिली. दिलशान आणि म्हातारा विश्वंभर परेवाल याने छान रंगवला.
सायली ही अत्यंत छाेटी व्यक्तिरेखा तिष्षा मुनवर यांनी साकारली हाेती. ती भाव खाऊन गेली. यासह नाटकात सार्थक जेजूरकर, राहित शिंदे, राेहित बनताेडे, हर्षद झाेमण, ज्ञानेशवर वारडे, सिद्धी माडीवाले, वैष्णवी वांद्रे, श्रावणी जाधव यांच्या भूमिका हाेत्या. आटाेपशीर, साजेसे असे स्वप्नील नरवडे, प्रतीक विसपुते यांचे नेपथ्य, आेम देशमुख यांचे संगीत छान हाेते. तर अनेक ठिकाणी प्रकाशयाेजनेसाठी प्रसंग उभे केल्याचे कृतार्थ कन्सारा यांच्या दिग्दर्शकीय काैशल्यातून दिसत हाेते. रवींद्र जाधव यांची रंगभूषा हाेती. वेशभूषा पूजा पूरकर, आरती वाटपाडे यांची हाेती.