कैलास श्रावणे
तालुका प्रतिनिधी पुसद
पुसद : कार्यक्रमाला राज्यातील तमाम आदिवासी बांधवांसह महिला भगिनींनी सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित रहावे प्रतिनिधी पुसद देशातील आदिवासी बांधवांसाठी ऐतिहासिक दिवस ठरणारी तारीख म्हणजे दि. १८ सप्टेंबर आहे. या शुभदिनी आदिवासी क्षेत्र बंधन मुक्ती दिन व समाज भूषण पुरस्कार वितरण सोहळा पुसद येथील बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रेक्षागृह सभागृहामध्ये संपन्न होणार आहे. सदर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून राज्याचे माजी मंत्री तथा विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात तर अध्यक्ष म्हणून माजी मंत्री शिवाजीराव मोघे उपस्थित राहणार आहेत. प्रमूख वक्ते म्हणून सेवानिवृत्त उपसचिव मंत्रालय मुंबईचे सदानंद गावित तसेच परभणीचे प्रा.राजेश धनजकर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. या कार्यक्रमास आ. ॲड. निलय नाईक, आ.डॉ. वजाहत मिर्झा यांची विशेष उपस्थिती राहणार असल्याची माहिती येथील विश्रामगृहात दि. १४ सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी १२ वाजता आयोजित पत्रकार परिषदेमध्ये आयोजकांनी कळविले आहे.
खुल्या विधानसभा मतदार संघातून निवडून आल्याबद्दल आ. भिमराव केराम,माजी आ. उत्तमराव इंगळे,माजी आ. डॉ. संतोष टारफे यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.तसेच समाजातील उच्चपदस्थ असलेले सेवानिवृत्त सनदी अधिकारी संभाजीराव सरकुंडे, नरेंद्र पोयाम यांचाही समाजभूषण म्हणून सत्कार होणार आहे.दि.१८ सप्टें १९७६ रोजी क्षेत्र बंधन रद्द करणाऱ्या विधेयकावर देशाचे तत्कालिन राष्ट्रपती महामहिम फकरूदिन अली अहमद यांची स्वाक्षरी झाली आणि या दिवसापासून आदिवासींच्या जनजीवनात अमुलाग्र बदल होवू लागलेत. संविधानातील अनुसूचित जमातीच्या यादीत अनेक जमाती असुनही केवळ क्षेत्र बंधनामुळे त्यांना अनुसुचित जमातीच्या सोयी सवलती व घटनात्मक अधिकार मिळत नव्हते.क्षेत्र बंधन ही जाचक अट रद्द करण्यासाठी आदिवासी युवक कल्याण संघाच्या वतीने शिवाजीराव मोघे यांच्या नेतृत्वात १९६६ पासून एक आंदोलन उभे केले. त्यात अनेक कार्यकर्त्यांनी हिरीरीने सहभाग घेतला होता. या शिष्टमंडळाने महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री कै.वसंतराव नाईक यांच्या माध्यमातून श्रीमती इंदिरा गांधी यांची भेट घेतली. त्यावर इंदिरा गांधीने त्या संदर्भातले घटनादुरुस्ती विधेयक संसदेत मांडून ते पास करुन घेतले. दि. १८ सप्टें १९७६ रोजी तत्कालीन राष्ट्रपतींनी या विधेयकावर स्वाक्षरी केली आणि या विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाले. कायद्याची अंमलबजावणी देशभर झाल्यामुळे संविधानाच्या अनुसुचित जमाती यादीतील ४७ जमातींना आदिवासींच्या सोयी सवलती लागू झाल्यात. म्हणून दि. १८ सप्टेंबर ही तारीख आपल्या जीवनात बदल घडवून आणणारी ऐतिहासिक तारीख ठरली आहे. या तारखेचे आणि या आंदोलनात सहभागी झालेल्या कार्यकत्यांचे दरवर्षी स्मरण व्हावे म्हणून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या आंदोलनात सहभागी झालेल्या हयात कार्यकर्त्यांचा सपत्निक आदरपूर्वक समाज भूषण म्हणून सत्कार करण्यात येणार आहे. जे कार्यकर्ते हयात नाहीत त्यांच्या कुटुंब प्रमुखाचा सत्कार करण्यात येणार आहे. त्याच बरोबर आदिवासी समाजातील ज्या कार्यकर्त्यांनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सहकार, उद्योग -व्यवसाय, साहित्य, क्रिडा, संगीत आदी क्षेत्रात गेल्या १५ ते २० वर्षापासून उल्लेखनीय काम करत आहेत. त्यांचाही सपत्निक समाज भूषण म्हणून सत्कार करण्यात येणार आहे. अशा या महत्वपूर्ण कार्यक्रमाला राज्यातील तमाम आदिवासी बांधवांसह महिला भगिनींनी सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन पत्रकार परिषदेच्या माध्यमातुन आदिवासी क्षेत्रबंधन मुक्ती दिन आयोजन समितीचे माधवराव वैद्य, ज्ञानेश्वर तडसे, सुरेश धनवे, ॲड.सुनिल ढाले, राजेश ढगे, मारोती भस्मे, ॲड.रामदास भडंगे, गजानन टारफे ,रामकृष्ण चौधरी, नारायण कऱ्हाळे, अर्जुन हगवणे, गजानन उघडे, श्यामराव व्यवहारे, शालीक हगवणे, तातेराव भडंगे, राजेश घुक्से ,राजु पेदेवाड, रामदास कोठुळे , बालाजी उघडे,किसन कोठुळे, सुनिल बुरकुले,अनिल खूपसे, अशोक तडसे यांनी केले.