बुलडाणा, दि. २५: शहराचे ऐतिहासिक महत्व लक्षात घेवुन या शहराच्या विकासासाठी प्रयत्न करावयाचे आहे. तसे प्रयत्न सुरु देखील आहे. परंतु कोवीड मुळे या विकास कामांमध्ये अडथळा निर्माण झाला होता. आता कोविड असला तरी निर्बंध शिथील झाले आहे. त्यामुळे शहराच्या विकासाची कामे सुरु करण्यात येत आहे. ही विकास कामे गतीने पूर्ण करण्यात यावी अशा सूचना पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी आज दिल्या. सिंदखेड राजा पंचायत समिती सभागृहात सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार सुप्रियाताई सुळे, नियोजन मंडळाचे सदस्य ॲड नाझेर काझी, सभापती मीनाताई बंगाळे, जिल्हाधिकारी एस राममुर्ती, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, वंशज शिवाजी जाधव, नगराध्यक्ष सतिश तायडे, राज्य पुरातत्व विभागाच्या अधिकारी जया वाहणे, केंद्रीय पुरातत्व विभागाचे संर्वधक मिलींद अंगाईतकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. काळवाघे, विद्युत मंडळाचे अभियंता आदी उपस्थित होते. पालकमंत्री पुढे म्हणाले, सिंदखेड राजा शहराची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री ना. उध्दव ठाकरे यांनी आपणाला शब्द दिला आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील या संपूर्ण विकास कामाची दखल घेणार आहे. तसेच खासदार सुप्रीयाताई सुळे दिल्ली दरबारी मदत करणार आहे. त्यामुळे त्यांनी सांगीतलेले प्रस्ताव तत्काळ पाठविण्याच्या सुचनाही पालकमंत्री यांनी दिल्या. या बैठकीत मान्यवरांनी राज्य व केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अधिकारयांकडुन स्मारकांच्या विकास कामाचा आढावा घेतला. खासदार सुप्रियाताई सुळे म्हणाल्या, ज्या गोष्टी अन्य देशात पाहयला मिळत नाहीत, त्या आपल्याकडे अधिक आहेत. विशेष करुन पर्यटन वाढीसाठी ऐतिहासिक वास्तुंचे जतन, संर्वधन झाले पाहीजे. यासाठी सर्वांच्याच प्रयत्नांची गरज आहे. सिंदखेड राजा, लोणार व शेगाव या तिनही महत्वपुर्ण शहरांना जोडण्याची योजना आखली जावी. सिंदखेड राजा शहरातील पायाभुत सुविधांवर काम करण्याची आवश्यकता आहे. सिदखेड राजाच्या पर्यटन आणी ऐतिहासीक वास्तु संर्वधनासाठी आपण पालकमंत्री डॉ शिंगणे याचेंसोबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व पर्यटन मंत्रयाची भेट घेणार आहोत. येथील विकास कामासंदर्भात सर्व प्रस्ताव केंद्रीय पुरातत्व विभागाने तत्काळ आपल्याकडे पाठवावे, अशा सूचनाही खासदार सुप्रियाताई सुळे यांनी दिल्या. त्या पुढे म्हणाल्या, लखोजिराव जाधव यांच्या राजवाडयाला राष्ट्रीय स्मारक घोषीत करण्यासाठी आपण संसदेत हा विषय मांडणार आहे. दरम्यान वन विभागातील इको टुरीझम प्रकल्प, जालना-खामगाव-शेगाव रेलवेमार्ग हे विषय त्यांनी समजुन घेतले. सावित्री जिजाउ दशरात्रोत्सव महोत्सव ३ जानेवारी ते १२ जानेवारी या दरम्यान शहरात साजरा केला जातो. हा महोत्सव वेरुळ महोत्सवाच्या धर्तीवर साजरा व्हावा, या मागनीला त्यांनी दुजोरा दिला. हा कार्यक्रम महीला सक्षमीकरणासाठी संदेश देणारा ठरावा आशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. बैठकीला संबधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.