कुरखेडा : तालुक्यातील रामगड येथे सिताफळ व जांभूळ प्रकल्पाला भेटविभागीय आयुक्त श्रीमती प्राजक्ता लवंगारे यांनी दुर्गम भागातील कुरखेडा येथील रामगड येथे महिला बचतगट द्वारे सुरू असलेल्या सिताफळ व जांभुळ प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी स्थानिक महिलांशी संवाद साधून तयार होत असलेल्या विविध पदार्थांना नागपूर सारख्या शहरात बाजारपेठ मिळवूण देण्यासाठी प्रयत्न करू असे सांगितले. यावेळी रामगड संगिनी ग्रामसंघाद्वारे आयुक्तांना प्रकल्पाबद्दल माहिती देण्यात आली. तसेच पदार्थ निर्मिती, पॅकेजिंग, विक्री व फायदे तोटे समजून घेतले. गडचिरोली सारख्या दुर्गम भागातील महिला अतिशय चांगल्या प्रकारे काम करून कुटुंबाला अर्थिक पाठबळ देत आहेत तसेच स्वत:च्या पायावर उभे राहून त्यांनी सर्वांसमोर एक प्रकारचा आदर्शच निर्माण केला आहे अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. यावेळी जिल्हाधिकारी संजय मीणा, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद, उप विभागीय अधिकारी समाधान शेंडगे, महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियानाच्या चेतना लाटकर उपस्थित होत्या. यावेळी विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे यांनी महिला बचतगट द्वारे तयार केलेल्या विविध पदार्थांचा आस्वादही घेतला. बचत गटाने जांभूळ पल्प, सीताफळ, अंबाडी, मोहाचे लाडू, मध आदी विविध पदार्थ व फळ प्रकियेची माहिती दिली. यावेळी महिला बचत गटाच्या सिताफळ व जांभुळ प्रकल्पाचे श्रीमती प्राजक्त लवंगारे यांनी कौतुक करुन भविष्यात इतर ठिकाणीही महिला बचत गटाद्वारे असे विविध उपक्रम पाहवयास मिळतील अशी आशा व्यक्त केली. त्याकरीता बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याची प्रक्रिया राबविणार असल्याचे त्या बोलल्या. महिला बचत गटाद्वारे तयार केलेल्या उत्पादनाला नागपूर येथील नामांकीत कंपनीसोबत जोडून पदार्थांची विक्री केंद्र सुरु करता येईल का याबाबतही माहिती घेण्याच्या सूचना त्यांनी संबंधितांना यावेळी केल्या.