– विकासविषयक दिलासा; मागण्यांवर सकारात्मक भूमिका
नितेश डोंगरे
जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर
चंद्रपूर:– चंद्रपूरच्या विकासाचा नवा अध्याय लिहिण्यासाठी माजी अर्थमंत्री,आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात महापौर सौ. संगीता खांडेकर यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन शहराच्या प्रगतीचा आराखडा मांडला. नगरसेवक राहुल पावडे व राजेंद्र खांडेकर यांच्यासह मुख्यमंत्री कार्यालयात पोहोचलेल्या या शिष्टमंडळाचे पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी सर्वांच्या नवनियुक्तीबद्दल शुभेच्छा देत उत्तम कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी झालेल्या चर्चेत महापौर खांडेकर यांनी चंद्रपूर शहराच्या सर्वसमावेशक विकासासाठी राज्य सरकारकडून अधिकाधिक निधीची आवश्यकता असल्याचे नमूद केले. विशेषतः जीएसटी भरपाईचा हप्ता वाढवून देणे व पंधराव्या वित्त आयोगाचा निधी लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी ठामपणे मांडली. तसेच शहरातील मूलभूत सुविधा आणि नियोजित विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध प्रलंबित प्रस्तावांबाबत मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधून घेतले.
‘शाश्वत विकासासाठी राज्याची साथ राहील’ – मुख्यमंत्र्यांची ग्वाही:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रपूरच्या विकासाबाबत गांभीर्याने विचार करत सर्व मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद दिला. “चंद्रपूर शहराचा सर्वांगीण विकास हा राज्य सरकारच्या प्राधान्यक्रमात आहे. येत्या काळात महापालिकेला प्रशासकीय व आर्थिकदृष्ट्या पूर्ण पाठिंबा देऊन शहराचा शाश्वत विकास साकार करू,असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. या भेटीमुळे चंद्रपूरच्या विकासकामांना गती मिळणार असून महापौरांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत.











