जलील शेख
जिल्हा प्रतिनिधी परभणी
पवित्र रमजान महिन्याच्या
पार्श्वभूमीवर पाथरी शहर व तालुक्यातील ग्रामीण भागात २४ तास अखंडित वीज पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पाथरी तालुका वतीने करण्यात आली आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (महावितरण) उपविभाग पाथरी येथे लेखी निवेदन सादर करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष अविराज तुकाराम टाकळकर यांनी मा. उपविभागीय अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (महावितरण), उपविभाग पाथरी यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ पासून पवित्र रमजान महिना सुरू होत असून हा महिना मुस्लिम बांधवांसाठी अत्यंत पवित्र आणि उपासनेचा काळ आहे. रमजान महिन्यात मुस्लिम बांधव पहाटे ‘सहेरी’साठी लवकर उठतात तसेच रात्री ‘तरावीह’ची विशेष नमाज अदा करतात. दिवसभर कडक उपवास (रोजा) पाळला जात असल्यामुळे प्रकाश व पाण्याची सुविधा अत्यावश्यक ठरते. सध्या उन्हाची तीव्रता वाढलेली असल्याने वीज पुरवठा खंडित झाल्यास उपवास करणाऱ्या नागरिकांना, विशेषतः वृद्ध व लहान मुलांना मोठा त्रास सहन करावा लागतो, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. रमजानपूर्वी पाथरी शहर व ग्रामीण भागातील सर्व विद्युत वाहिन्या, ट्रान्सफॉर्मर (डीपी) तसेच इतर तांत्रिक बाबींची दुरुस्ती तातडीने पूर्ण करण्यात यावी, तसेच फ्युज कॉल मोबाईल सेवा २४ तास कार्यान्वित ठेवावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ ते २२ मार्च २०२६ या कालावधीत अखंडित वीज पुरवठा सुरळीत ठेवण्याबाबत महावितरण प्रशासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी नम्र विनंती करण्यात आली आहे. या निवेदनाची प्रत मा. अधीक्षक अभियंता, महावितरण कार्यालय परभणी तसेच मा. कार्यकारी अभियंता, महावितरण कार्यालय सेलू यांनाही देण्यात आली आहे. रमजानच्या पवित्र काळात मुस्लिम बांधवांना कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागू नये, यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.











