मुंबई : राज्याच्या राजकारणातील आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी… राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मुंबईतील राजभवनात हा शपथविधी सोहळा पार पडला. अजित पवार यांनी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली आहे. 2019 पासून राज्याच्या राजकारणात सातत्याने बदल होत आहेत. 2019 पासून राज्यात तीन सरकार सत्तेत आले. यातील तीनही सरकारमध्ये अजित पवार उपमुख्यमंत्री झालेत. 2019 ला अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जात सरकार स्थापन झालं. तेव्हा त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. पण काहीच दिवसात अजित पवार यांचं बंड मोडीत निघालं. नंतर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारमध्येदेखील अजित पवार उपमुख्यमंत्री होते. तर आता शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजित पवार सामील झाले आहेत.