मुंबई : राज्यातील २६ ठिकाणी गोवरचा संसर्ग आढळून आला असून सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आणि महानगरपालिकेच्या यंत्रणांकडून सर्व्हेक्षण आणि तपासणी करण्यात येत आहे. गोवरची लक्षणे असल्यास संबंधित बालकांची, मुलांची माहिती तत्काळ आरोग्य विभागास दिली जावी, अशा सूचना शाळा व्यवस्थापनाला देण्यात आल्या आहेत. तसेच अशा बालकांना ७ दिवस विलगीकरणात उपचार करून स्थलांतरीत करण्यात यावे, अशा सूचना आरोग्य विभागाला देण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी बुधवारी (ता.३०) दिली.
राज्यातील गोवर प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत आढावा घेतल्यानंतर आरोग्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले, मुंबई, मालेगाव, भिवंडी, औरंगाबाद, सोलापूरमध्ये गोवरची साथ पसरत आहे. याची सुरुवात मुंबईत झाली. राज्यात ८२५ आरोग्य पथकांद्वारे गोवर प्रतिबंधक लसीकरणाविषयी जनजागृती करण्यात येत आहे. तसेच रुग्णांबाबत कशी काळजी घ्यायची, याची माहिती जनतेपर्यंत पोहोचवली जात आहे. गोवर प्रतिबंधात्मक औषधे, अ जीवनसत्वाची मात्रा भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत. सर्वत्र औषधे आणि लसी उपलब्ध असल्याचे सावंत यांनी सागितले.