सागर घरत
करमाळा तालुका प्रतिनिधी
करमाळा: तालुक्यातील दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या बंद नलिका वितरण प्रणालीचे काम पुन्हा सुरू झाले आहे. माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या प्रयत्नातून या योजनेसाठी 116 कोटी रुपयांचा निधी मंजूर होऊन डिसेंबर 2023 मध्ये कामाला सुरुवात झाली होती. मात्र नोव्हेंबर 2024 मधील सत्तांतरानंतर हे काम बंद झाले होते.हे काम पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अर्जुननगर फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. अखेर या आंदोलनाला यश मिळून बंद नलिका वितरण प्रणालीचे काम पुन्हा सुरू झाले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष तथा पंचायत समितीचे नवनियुक्त सदस्य भरत भाऊ अवताडे यांनी दिली.दरम्यान, या योजनेला पूर्वी विरोध करणाऱ्यांचा विरोध आता का मावळला, याबाबत मतदारसंघात विविध चर्चा सुरू असल्याची प्रतिक्रिया पक्षाचे प्रवक्ते ॲड. अजित विघ्ने यांनी दिली.










