भगवान कांबळे
जिल्हा प्रतिनिधी नांदेड
नांदेड : कायदेशीर अधिकार असलेल्या जिल्हाधिकारी यांच्या प्रास्थापीत अध्यादेशाचे उल्लंघन केल्यामुळे माहुर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या मौजे लखमापूर येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत ५ डीजे कर्णकर्कश्श आवाजात वाजविल्याने त्यांच्यावर दि.२४ रोजी गुन्हे दाखल करण्यात आले असून डीजे सह चार वाहन असा एकूण १ कोटी ३७ लक्ष रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार भोंडवे व पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांनी डिजे वाजविणाऱ्या वाहनासह गणेश मंडळातील व इतर नागरीकांवर माहुर पोलीस ठाण्यात दि. २४ रोजी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. लखमापूर चे बिट जमादार संदीप पुंडलिकराव गोपनवाड यांनी माहुर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याप्रमाणे दि.२४/०९/२०२६ रोजी लखमापूर बिट मधील लांजी,शेकापुर, लखमापूर इत्यादी गावांमध्ये श्री गणेश मुर्तीचे विसर्जन असल्याने स्किम प्रमाणे बंदोबस्त कामी लावण्यात आले होते. शेकापुर येथील विसर्जन आटोपल्यानंतर मी माझ्या बिट मधील मौजे लखमापूर येथील श्री गणेश मुर्तीचे विसर्जन बंदोबस्त कामी असता सोबत पोहेकाॅ चौधरी,पोकाॅ जाधव पोकाॅ सोनसळे, चव्हाण, शिंदे, वर्मा, वानखेडे, राठोड,भगत, चांदेकर, चव्हाण, अंमलदार बंदोबस्त कामी लावण्यात आले होते. सदर मिरवणुकीत ०२ परवाना धारक, विनापरवाना धारक ०३ असे एकूण पाच गणेश मंडळ सहभागी झाले होते. सदर मिरवणुकीत नांदेड जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन करून प्रतिबंधीत असलेली डाॅलबी डिजे सिस्टिम वाजवण्याची बंदी असताना सदर मिरवणुकीत डॉल्बी सिस्टीम लावून कर्णकर्कश्श मोठ्या आवाजात मिरवणुकीत सार्वजनिक उपद्रव होऊन नागरीकांच्या आरोग्यास,जिवीत्वास धोका निर्माण होईल अशा आवाजत मिरवणुक असल्याने व पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांनी दिलेल्या तोंडी व लेखी आदेशाकडे दुर्लक्ष करत श्री गणेश मुर्तीचे विसर्जन मिरवणूक वेळेत न संपवता विनाकारण रेंगाळत ठेवल्याने तसेच जिल्हाधिकारी यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून आवज्ञा केल्यामुळे डाॅल्बी सिस्टीम डिजे वाहन ताब्यात घेऊन पोलीस ठाणे माहुर येथे आणुन लावण्यात आले असून किंमत अंदाजे १,३७,००,००० रुपयांचा एकुण मुद्देमाल जप्त करून इतर सहकार्य करणाऱ्या नागरीकावर पोहेकाॅ गोपनवाड यांच्या फिर्यादीवरून पोहेकाॅ पुष्पा पुसनाके यांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार भोंडवे, पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी शरद घोडके यांचे सह पोलीस करत आहेत.




