संजय शिंदे
जिल्हा प्रतिनिधी पुणे
इंदापुर तालुक्यातील प्रधानमंत्री आवास योजना,रमाई आवास योजना,शबरी आवास योजना तसेच इतर मागासवर्गीय प्रवर्गातील मोदी आवास योजनेतील घरकुलांची बांधकामे पूर्ण झाली असून तीन-चार महिने अशीच निघून गेली आहेत.संबधित बांधकामाचे अभियंता फोटो काढून गेले.सरपंचाच्या सह्या होऊन प्रस्ताव दाखल झाले.बिल अजूनही कार्यालयात धुळ खात पडून असल्याने लाभार्थ्यात असंतोषाची तीव्र लाट पसरली आहे.मार्च शेवटी तरी बिल पडेल अशी आशा होती ती पण हवेतच विरून गेली.40%लाभार्थ्यांना बिलं मिळाली आणि 60%लाभार्थ्यांच्या तोंडाला पाने पुसली अशी तिखट प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहे.बांधकाम पूर्ण होऊन दुसरा,तिसरा ,चौथा हप्ता पडत नसेल तर घरकुल देताच कशाला?अशीही प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहे.आज घरकुलांची बांधकामे पूर्ण झाल्याने लाभार्थी आपली पेरणीची कामे सोडून पंचायत समिती इंदापूर येथे खेटे घालावे लागत आहे.निधीच नाही तर आम्ही काय करू? असे उत्तरे अधिकारी देत असल्याने निधीच्या अपेक्षेत असलेल्या व दुर्दम्य आशावादी असलेल्या लाभार्थ्यांचा निधी बाबत भ्रमनिरास होतांना दिसत आहे.अनेकांचा संसार उघड्यावर पडला आहे.याकडे दुर्लक्ष झाल्यास घरकुल धारकांच्या जिवितहानीची शक्यता नाकारता येत नाही.याकडे शासनाने खास लक्ष केंद्रित करून निधी उपलब्ध करून द्यावा अशी माफक अपेक्षा असने गैर नसल्याची चर्चा इंदापूर तालुक्यात सुरू आहे.





