संजय शिंदे
जिल्हा प्रतिनिधी पुणे
भिगवण मधील ग्रामस्थ नागरी समस्यांनी हैराण झाले असून आदर्श विद्यालय रस्त्यावरील सांडपाणी रस्त्यावरून वाहत त्याच्या कडेलाच साचून राहत असल्याने परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली असून याचा त्रास विद्यार्थ्यांना तसेच येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना होत आहे त्यामुळे प्रशासना विरोधात प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.
तसेच याच रस्त्यावर कचऱ्याची समस्या निर्माण झाली असून घाणीचे व दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे.त्यामुळे नागरिकांच्या, विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. कचरा उचलणारे वाहन वेळेवर येत नसल्याने कचरा साठून परिसरात रोगराई पसरण्याची भीती व्यक्त होत आहे.सांडपाणी आणि कचऱ्याच्या दुर्गंधीने तेथे राहणाऱ्या नागरिकांना घरच्या खिडक्या उघडणेही कठीण झाले आहे. तसेच वॉर्ड क्र १ येथील अण्णाभाऊ साठे समाज मंदिर परिसरातही साठलेल्या कचऱ्याने अस्वच्छता पसरली आहे.
याबाबत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वारंवार सांगूनही वेळेवर साफसफाई होत नसल्याचे दिसून येत आहे.तसेच गावातील काही रस्त्यांवर धुळीचे साम्राज्य निर्माण झाले असून रस्त्यावरून चार चाकी गाडी गेल्यास अक्षरशः धुळीचे लोट निर्माण होत आहेत त्यामुळे गाडी चालक आणि पादचारी त्रस्त झाले आहेत.अनेक ठिकाणी तर गटार लाईन वरील चेंबर फुटल्याने त्यातूनही दुर्गंधी पसरत आहे.अशा कित्येक प्रकारच्या समस्येने भिगवणकर त्रस्त झाले आहेत प्रशासन मात्र निद्रिस्त अवस्थेत असल्याचे चित्र आहे.याबाबत ग्रामपंचायत अधिकारी दत्तात्रय परदेशी यांचेशी संपर्क केला असता, त्याठिकाणी कर्मचारी पाठवून कचरा साफसफाई करण्यात येईल,तसेच एक ते दोन दिवसात इतर कामे करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.










