संजय शिंदे
जिल्हा प्रतिनिधी पुणे
दौंड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये काही बुलेट व इतर मोटारसायकल चालकांकडून वाहनांचे मूळ सायलेंसर बदलून मोठा व कर्णकर्कश आवाज करणारे मॉडिफाईड सायलेंसर बसविण्यात आल्याच्या तक्रारी प्राप्त होत होत्या. अशा वाहनांमुळे सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत असून सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेचा भंग होत असल्याचे निदर्शनास आले होते.या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली दौंड पोलीस स्टेशनकडून विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान एकूण १९ बुलेट व मोटारसायकली ताब्यात घेऊन त्यांची तपासणी करण्यात आली.तपासणीअंती संबंधित वाहनांवर बसविण्यात आलेले मॉडिफाईड सायलेंसर काढून टाकण्यात आले. तसेच वाहनधारकांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली. याशिवाय भविष्यात अशा प्रकारचे बेकायदेशीर बदल न करण्याबाबत वाहनधारकांना समज देण्यात आली.दौंड पोलीस स्टेशनमार्फत वाहनधारकांना आवाहन करण्यात आले आहे की, वाहनांमध्ये नियमबाह्य बदल करून ध्वनीप्रदूषण निर्माण करू नये. मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध यापुढेही अशाच प्रकारच्या कठोर कारवाया सातत्याने करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिली.





