संजय शिंदे
तालुका प्रतिनिधी इंदापूर
इंदापूर तालुक्यात काल झालेल्या अवकाळी वादळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विशेषतः केळी, डाळिंब, ऊस तसेच इतर भाजीपाला व फळबागांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाला आहे.इंदापूर तालुक्यातील वडापुरी, सुरवड, वकीलवस्ती, शेटफळ हवेली, बावडा, टणू, गणेशवाडी, पिंपरी बु, लाखेवाडी, गिरवी या गावांमधील शेतकऱ्यांच्या शेतात मोठ्या प्रमाणावर पिकांची पडझड झाली आहे. अनेक ठिकाणी केळीची झाडे उन्मळून पडली असून डाळिंब बागांचेही मोठे नुकसान झाले आहे. ऊस पिकेही वाऱ्यामुळे आडवी झाली आहेत.या पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवर तात्काळ पाहणी करण्यात आली. भाजप नेते प्रदीप गारटकर व प्रविण माने यांनी संबंधित भागात प्रत्यक्ष बांधावर जाऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेतली. त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या तसेच या कठीण प्रसंगी शेतकऱ्यांना धीर देण्याचे काम केले.यावेळी त्यांनी प्रशासनाकडे ठोस मागणी केली की, कृषी विभागाने तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ द्यावा. तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीसाठी सरसकट मदत व योग्य नुकसानभरपाई त्वरित देण्यात यावी.भाजप नेते प्रदीप गारटकर व प्रविण माने यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, शेतकरी हा आधीच आर्थिक संकटात सापडलेला असून अशा नैसर्गिक आपत्तींमुळे त्यांची परिस्थिती अधिकच बिकट होते. त्यामुळे शासनाने संवेदनशील भूमिका घेऊन तातडीने मदत जाहीर करावी.त्याचबरोबर त्यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले की, या नैसर्गिक संकटात खचून जाऊ नये, शासन त्यांच्या पाठीशी उभे राहील यासाठी प्रयत्न सुरू आहेत.शासनाने या नुकसानीची गंभीर दखल घेऊन तात्काळ कार्यवाही करावी, अशी एकमुखी मागणी यावेळी करण्यात आली आहे.






