संजय शिंदे
तालुका प्रतिनिधी इंदापूर
गाळ मिश्रित आणि दूषित पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, परिसरात विविध आजारांची भीती निर्माण झाली आहे.गावामध्ये गेल्या काही दिवसांपासून नळांना गाळ मिश्रित, पिवळसर आणि दुर्गंधीयुक्त पाणी येत आहे. हे दूषित पाणी पिल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होणार असून परिसरात गॅस्ट्रो, डायरिया, आणि पोटाच्या विकारांचे रुग्ण वेगाने वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. जलवाहिनीतील गळती किंवा पाणीपुरवठा यंत्रणेतील बिघाडामुळे नळांना थेट मैला युक्त आणि गाळ मिश्रित पाणी येत आहे. यामुळे थेट आरोग्यावर परिणाम होत असून लहान मुले आणि वृद्धांना याचा सर्वाधिक फटका बसत आहे.शुद्ध पाण्यासाठी लोकांना जारचे पाणी विकत घ्यावे लागत असून सर्वसामान्यांवर आर्थिक भुर्दंड पडत आहे.स्थानिक नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे वारंवार तोंडी तक्रारी केल्या आहेत. परंतु, प्रशासनाकडून केवळ ‘दुरुस्ती सुरू आहे’ असे आश्वासन दिले जात आहे. अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने नागरिक आता आंदोलनाचा पावित्र्यात असल्याचे समजत आहे.दरम्यान प्रशासनाने तात्काळ पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांची तपासणी करून मुख्य जलवाहिन्या फुटल्या आहेत का, याची शोधमोहीम घेऊन दुरुस्ती करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच नागरिकांना नियमितपणे स्वच्छ आणि शुद्ध पाणी न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक रहिवाशांनी दिला आहे.ग्रामपंचायतीकडून गेल्या काही दिवसांपासून गाळयुक्त आणि दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा केला जात आहे. हे पाणी पिणे तर दूर, वापरण्यायोग्यही नाही. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. आम्ही नियमित पाणीपट्टी भरतो, मग आम्हाला हे ‘आजारांचे पाणी’ का दिले जात आहे? दूषित पाण्यामुळे गावात साथीचे आजार पसरल्यास त्याला सर्वस्वी ग्रामपंचायत जबाबदार असणार आहे अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू आहे.याबाबत ग्रामपंचायत अधिकारी दत्तात्रय परदेशी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, पाईपलाईन फुटल्याने गाळ मिश्रित झाला असावा सुरुवातील असे पाणी येईल परंतु नंतर एक-दोन दिवसात व्यवस्थित पाणी पुरवठा होईल.


