संजय शिंदे
जिल्हा प्रतिनिधी पुणे
इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, भिगवण येथे मंगळवार, दि. १७ मार्च २०२६ रोजी ‘उच्च शिक्षण आणि शाश्वत विकास’ या विषयावर एक दिवसीय राज्यस्तरीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या गुणवत्ता सुधार योजनेअंतर्गत या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले असून उच्च शिक्षणात वेगाने होत असलेल्या बदलांची ओळख आणि त्याची भविष्यकालीन उपयुक्तता याबाबत तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.या चर्चासत्रासाठी पुणे आणि सोलापूर, कोल्हापूर, अमरावती, उस्मानाबाद, सातारा जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रातील नामांकित तज्ज्ञ उपस्थित राहणार आहेत. यामध्ये पुणे येथील प्राचार्य महासंघाचे अध्यक्ष प्रा. डॉ. आबासाहेब देशमुख, एम. एस. के महाविद्यालय, सोमेश्वर तथा सदस्य व्यवस्थापन परिषद, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठचे प्रा. डॉ. देविदास वायदंडे आणि विठ्ठलराव शिंदे महाविद्यालय टेंभुर्णी सोलापूर येथील प्रा. डॉ . नेताजी कोकाटे, इंदापूर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन सरवदे , भूगोल अभ्यास मंडळ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे डॉ. शिवाजी मस्के व भिगवण महाविद्यालयातील भूगोल विभाग प्रमुख प्रा. डॉ . भास्कर गटकुळ यांचा समावेश आहे. हे तज्ज्ञ उच्च शिक्षण क्षेत्रातील बदल, नवीन शैक्षणिक धोरण, शिक्षण क्षेत्रातील आव्हाने व संधी अशा वेगळे विषयावर सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत.या चर्चासत्राच्या नोंदणीला आतापर्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून सुमारे १५० हून अधिक संशोधकांनी नोंदणी केली आहे. त्यामध्ये पुणे विद्यापीठ कार्यक्षेत्रातील सुमारे ९० प्राध्यापक, विद्यापीठ क्षेत्राबाहेरील सुमारे ६० प्राध्यापक तसेच 25 हून अधिक जिज्ञासू विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धनजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे चर्चासत्र आयोजित करण्यात आले असून महाविद्यालयाचे प्राचार्य व चर्चासत्राचे आयोजक डॉ. तानाजी मगर, कार्यक्रम समन्वयक प्रा. शाम सातार्ले, सहसमन्वयक प्रा. पद्माकर गाडेकर,अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक डॉ. सुरेंद्र शिरसट, तसेच संपूर्ण आयोजन समिती व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी त्यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले आहे.










