संजय शिंदे
जिल्हा प्रतिनिधी पुणे
इंदापूर तालुक्यातील अकोले गावाच्या हद्दीत खडकवासला धरणाच्या नवीन मुठा उजवा कालव्यात एका अनोळखी पुरुषाचे कुजलेल्या अवस्थेतील प्रेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी भिगवण पोलीस ठाण्यात मयत रजिस्टर क्रमांक १८/२०२६ नुसार नोंद करण्यात आली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि.१२ मार्च) सकाळी सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास अकोले–कळस रस्त्यालगत असलेल्या खडकवासला धरणाच्या नवीन मुठा उजवा कालव्याच्या किलोमीटर क्रमांक १७३ जवळील मोरीजवळ एका पुरुषाचे प्रेत वाहत येऊन पाईपमध्ये अडकलेले असल्याचे दिसून आले. याची माहिती गावातील अमर महादेव वणवे यांनी सतीश दशरथ सुबनावळ (वय ३४, व्यवसाय शेती, रा. अकोले ता. इंदापूर जि. पुणे) यांना फोनवरून दिली.माहिती मिळताच सतीश सुबनावळ घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी सागर रामदास कदम, विठ्ठल महादेव शिंदे, शंभुराज सुदाम ढवळे, अक्षय ज्ञानदेव वणवे, गणेश चंद्रकांत गिरीगोसावी आणि अमोल बाळू खामकर (सर्व रा. अकोले) हे नागरिक तेथे उपस्थित होते. पाहणी केली असता कालव्याच्या वाहत्या पाण्यात एका पुरुषाचे कुजलेल्या अवस्थेतील प्रेत पाईपमध्ये अडकलेले दिसून आले.यानंतर तात्काळ भिगवण पोलीस ठाण्याला कळविण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी येऊन स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढला. मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही.या घटनेची नोंद भा.न्याय प्रक्रिया संहिता (B.N.S.S.) कलम १९४ प्रमाणे करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हवालदार भस्मे करीत आहेत.










