‘मिशन झिरो ड्रॉप आऊट’ मोहिमेला सुरुवात
शकील खान
शहर प्रतिनिधी अकोला
अकोला :- ‘मिशन झिरो ड्रॉप आऊट’ अंतर्गत जिल्ह्यात शाळाबाह्य बालकांचे सर्व्हेक्षणाद्वारे माहिती संकलित करुन शिक्षण थांबलेल्या या बालकांच्या शिक्षणाच्या पुनः प्रारंभास प्राधान्य द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आज दिले.
मिशन झिरो ड्रॉप आऊट अंतर्गत दि.५ ते २० जुलै या कालावधीत शाळाबाह्य बालकांचे सर्व्हेक्षण केले जाते. अशाप्रकारे शाळाबाह्य आढळलेल्या वा मध्येच शिक्षण थांबवलेल्या बालकांच्या शिक्षणाला पुन्हा सुरुवात करण्यात येते. या मोहिमेच्या तयारीचा आढावा आज जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी घेतला. या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्य) डॉ. सुचिता पाटेकर, जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथ) वैशाली ठग, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या श्रीमती के.डी. चव्हाण, तसेच सर्व तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या सर्व्हेक्षणाबाबत समग्र शिक्षा जिल्ह्य समनव्यक आरती जाधव यांनी सादरीकरण केले. याद्वारे मिशन झिरो ड्रॉप आऊटची माहिती देण्यात आली. या सर्व्हेक्षणात वय वर्षे ६ ते १४ या वयोगटातील बालकांचे सर्व्हेक्षण होणार आहे. गाव, वाड्या आणि वस्त्यांमध्ये हे सर्व्हेक्षण होईल. शहरी भागातही झोपडपट्टी भागात सर्व्हेक्षण होईल. सर्व्हेक्षणासाठी पथके गठीत करण्यात आली असून सर्व्हेक्षणात आढळलेल्या मुलांना त्यांच्या वयाच्या समकक्ष वर्गात प्रवेश देऊन त्यांचा अभ्यास पुर्ण करुन घेण्यात येईल. सन २०२१-२२ मध्ये झालेल्या अशाच सर्व्हेक्षणात जिल्ह्यात १ली ते ४ थी मध्ये १८२ तर इयत्ता ५ वी ते ८वी मध्ये ६२ विद्यार्थ्यांना त्यांच्या वयानुरुप समकक्ष वर्गात प्रवेश देऊन शिक्षणाचा पुनः प्रारंभ करण्यात आला, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
जिल्हाधिकारी श्रीमती अरोरा यांनी निर्देश दिले की, जिल्ह्यात शाळाबाह्य बालकांच्या सर्व्हेक्षणास आजपासून प्रारंभ होत आहे. येत्या २० तारखेपर्यंत हे सर्व्हेक्षण सुरु राहणार असून या सर्व्हेक्षणानंतर आढळून आलेल्या शाळाबाह्य बालकांची माहिती व त्यांच्या शिक्षणासाठी करण्यात आलेले नियोजन याबाबतची माहिती सादर करावी. तसेच ज्या ज्या ठिकाणी अशा बालकांची संख्या जास्त असेल अशा बालकांसाठी नजिकची शाळा उपलब्ध करावी. त्यासाठी विटभट्टी मजूर, स्थलांतरीत मजूर अशा विविध घटकांतील कुटुंबांमध्ये सर्व्हेक्षणाद्वारे माहिती घ्या. स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन, नगरपालिका, मनपा प्रशासनानेही यात सक्रीय सहभाग घ्यावा,असे निर्देशही त्यांनी दिले.