पुणे : प्रतिकूल स्थितीमुळे नैर्ऋत्य मोसमी पावसाचा महाराष्ट्रातील प्रवेश सध्या रखडला असला, तरी १० किवा ११ जूनला दक्षिण कोकणात पूर्वमोसमी पाऊस जोर धरणार आहे. त्यामुळे मोसमी पावसाच्या प्रवेशासाठी अनुकूल स्थिती निर्माण होण्याचे संकेत आहेत. सध्या राज्यात बहुतांश भागात तापमानाचा पारा वाढला आहे. मात्र, अनेक भागांत पावसाळी वातावरण निर्माण होऊन तापमानात घट होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. अरबी समुद्रातून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांचा वेग मंदावला असल्याने गेल्या काही दिवसांपासून मोसमी पावसाचा प्रवास थांबला आहे. अरबी समुद्राच्या बाजूने २९ मे रोजी केरळमध्ये प्रवेश आणि त्यानंतर ३१ मे रोजी कर्नाटकातील कारवारपर्यंत मजल मारलेल्या मोसमी पावसाने गेल्या आठ दिवसांपासून कोणतीही प्रगती केली नाही. गोव्याच्या सीमेपासून काही अंतरावरच तो थकबला आहे. बंगालच्या उपसागराच्या बाजूनेही त्याची प्रगती गेल्या पाच दिवसांपासून थांबली आहे. सध्या संपूर्ण केरळ, कर्नाटक, तमिळनाडूचा काही भाग, पूर्वोत्तर राज्ये आणि पश्चिम बंगालमध्ये मोसमी पाऊस दाखल झाला आहे. या भागात काही प्रमाणात पाऊस होत आहे. महाराष्ट्रासह देशाच्या इतर भागांना आता मोसमी पावसाच्या प्रवेशाची प्रतीक्षा आहे. विदर्भातील काही भागांत अद्यापही उष्णतेची लाट कायम आहे. ब्रह्मपुरी येथे बुधवारी ४६.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. चंद्रपूर, गोंदिया, वर्धा आदी भागांतील तापमान ४५ अंशांपुढे आहे. मात्र, याच भागात काही ठिकाणी हलका पूर्वमोसमी पाऊसही होत आहे. मध्य महाराष्ट्रातील जळगाव, सोलापूर, नगर आदी भागांतील पारा वाढून ४० अंशांपार गेला आहे. मराठवाड्यातही काही भागांत तापमानात वाढ झाली आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात तुरळक ठिकाणी हलका पाऊस होत आहे. पुढील चार ते पाच दिवसांत राज्यातील तापमानात २ ते ३ अंशांनी घट होऊन उन्हाचा चटका कमी होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.