नवी दिल्ली : लडाखच्या तरतुक सेक्टरमध्ये झालेल्या वाहन अपघातात भारतीय लष्कराच्या ७ जवानांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर काही जण गंभीर जखमी झाले आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेने लष्कराच्या सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली. जखमींवर योग्य उपचार आणि काळजी घेण्याचे प्रयत्न सुरू असून, याअंतर्गत गंभीर जखमींना भारतीय हवाई दलाच्या माध्यमातून वेस्टर्न कमांडमध्ये हलविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय लष्कराच्या सूत्रांनी सांगितले की, रस्ता अपघातातील जखमींना सर्वोत्तम उपचार मिळावेत यासाठी प्रयत्न सुरू आहेत. गंभीर जखमींना वेस्टर्न कमांडमध्ये हलवण्यात येत आहे. यामध्ये हवाई दलाची मदत घेण्यात आली आहे. थोइसपासून सुमारे २५ किमी अंतरावर हा रस्ते अपघात झाला. शुक्रवारी 26 जवानांचे पथक परतापूरच्या संक्रमण शिबिरातून उप-सेक्टर हनिफच्या पुढच्या ठिकाणाकडे जात होते. सकाळी नऊच्या सुमारास वाहन रस्त्यावरून घसरून श्योक नदीत पडले. रस्त्यापासून नदीची खोली सुमारे 50-60 फूट आहे. त्यामुळे वाहनातील सर्व जवान गंभीर जखमी झाले. यापैकी सात जणांचा मृत्यू झाला. या सर्व 26 जवानांना परतापूर येथील 403 फिल्ड हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. लेहमधील सर्जिकल टीम्स परतापूरला पाठवण्यात आल्या आहेत.