नवी दिल्ली : यंदा मान्सूनची चाल चक्रीवादळामुळे मंदावली आहे. पावसाळा सुरू होऊन १५ दिवस होऊनही आतापर्यंत निम्म्या राज्यांमध्येही तो योग्य प्रकारे पोहोचलेला नाही. पावसाची चातकाप्रमाणे प्रतीक्षा करीत असलेल्या जनतेला दिलासा मिळणार आहे. तहानलेल्या महाराष्ट्राला मान्सूनचा पाऊस चिंब भिजविणार आहे. २४ जूनपासून मध्य महाराष्ट्र व विदर्भात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. मराठवाड्यातील काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. २३ ते २९ जूनदरम्यान मध्य भारतात चांगल्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर ३० जून ते ६ जुलैदरम्यान मान्सून भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर सक्रिय राहील, असाही अंदाज वर्तविण्यात आला असून, अनुकूल हवामानामुळे शुक्रवारपासून दक्षिण कोकणात पाऊस जोर पकडणार आहे. गेल्या २४ तासांत महाराष्ट्र, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, ओडिशा, बिहार आणि झारखंड या सहा राज्यांमध्ये उष्णतेची लाट होती. मात्र, महाराष्ट्रासह मध्य भारतातील वातावरण बदलण्यास सुरुवात झाली आहे. पावसामुळे आसामसह ईशान्येकडील राज्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. आसाममध्ये ब्रह्मपुत्रा नदीला उधाण आले आहे. आसाम राज्य आपत्ती दलानुसार राज्यातील दहा जिल्ह्यांमध्ये पुरामुळे परिस्थिती वाईट आहे. १०८ गावांतील १ लाख २० हजार लोक बाधित झाले आहेत. नलबारी जिल्ह्यात सर्वाधिक ४५ हजार लोक पुराने बाधित झाले आहेत.