नवी दिल्ली : विधानभवनातील शिवसेना पक्ष कार्यालयानंतर आता संसदेतील शिवसेना गटाचे कार्यालय शिवसेनेच्या शिंदे गटाला देण्यात आलं आहे. शिंदेगटाचे नेते राहुल शेवाळे यांना पत्र लिहून उपसचिव सुनंदा चॅटर्जी यांनी ही माहिती दिली आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या नाट्यमय घडामोडीनंतर संसदेतील हे कार्यालय शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांकडून वापरण्यात येत आहे. वादादरम्यान देखील दोन्ही गट या एकाच पक्ष कार्यालयात बसत होते. पण आता ही मालकी पूर्णपण लोकसभा सचिवालयाने शिवसेना शिंदे गटाला दिली आहे. जो प्रकार काल विधानसभेच्या पक्ष कार्यालयात होताना दिसला तोच प्रकार आज संसदेच्या बाबतीत देखील होताना दिसत आहे. संसदेतील शिवसेनेचे कार्यालय हे शिंदे गटाला देण्यात आले आहे.
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का
एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर शिवसेनेत अंतर्गत फूट पडली. तेव्हापासून महाराष्ट्राच्या राजकारणात शिंदे गट आणि ठाकरे गट असे दोन गट पाहायला मिळाले. दोन्ही गटांकडून अनेक दावे-प्रतिदावे करण्यात आले. तसेच, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. तिथून पुढे ही लढाई सर्वोच्च न्यायालयात पोहोचली आणि तिथून या प्रकरणाला अनेक फाटे फुटले. अशातच शुक्रवारी (17 फेब्रुवारी) केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि पक्षाच्या निवडणूक चिन्हाबाबत मोठा निर्णय दिला.


