इंग्रजी भाषेच्या परीक्षेत विचारण्यात आलेल्या एका अश्लील प्रश्नामुळे गदारोळ झाला आहे. भावा-बहिणीतील शारीरिक संबंध योग्य का अयोग्य? असा प्रश्न विचारण्यात आल्याने सदर प्राध्यापकाविरुद्ध कारवाईची मागणी करण्यात आली आहे. हा प्रकार पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथील कॉमसॅट्स विद्यापीठात घडला आहे. या विद्यापीठात घेतल्या गेलेल्या परीक्षेत एक प्रश्न असा होता, ज्यावर आक्षेप घेण्यात आला आहे. विद्यापीठाच्या इंग्रजीच्या पेपरमध्ये भावा-बहिणीतील शारीरिक संबंध योग्य का अयोग्य? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर आपले विचार प्रकट करण्यास सांगण्यात आलं होतं. या प्रश्नपत्रिकेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. ते पाहून पाकिस्तानमधील एका राजकीय पक्षातील कायदेविभागाचे प्रमुख मुहम्मद अल्ताफ यांनी तक्रार दाखल केली. अशा प्रकारच्या अश्लील प्रश्नामुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. हे इस्लामविरोधी असून त्यावर कारवाई करावी, अशी मागणी अल्ताफ यांनी केली आहे. दरम्यान, विद्यापीठाने यासंबंधी एक पत्रका जाहीर केलं असून सदर प्रश्नपत्रिका बनवणाऱ्या प्राध्यापकाला निलंबित करून काळ्या यादीत टाकण्यात आल्याची माहिती विद्यापीठाने दिली आहे. पाकिस्तानच्या विज्ञान आणि प्रौद्योगिकी मंत्रालयाने देखील या प्रकरणाची दखल घेऊन दोषींविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.