मुंबई : राज्य शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष साहाय्य विभागातर्फे २०२३-२४ या वर्षीच्या परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीच्या अर्जांसाठी मुदतवाढ देण्यात आली. त्यानुसार विद्यार्थ्यांना ५ जुलैपर्यंत अर्ज करता येईल. समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी ही माहिती दिली. योजनेंतर्गत पदव्युत्तर पदवी आणि पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी क्यूएस जागतिक क्रमवारीतील पहिल्या तीनशे संस्थांतील शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेणाऱ्या अनुसूचित जाती प्रवर्गातील ७५ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते. योजनेसाठी पात्र विद्यार्थ्यांना विमान प्रवास भाडे, परदेशातील शैक्षणिक संस्थेची शिक्षण शुल्क, निर्वाह भत्ता, आकस्मिक खर्च दिला जाईल. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी ३५ वर्षे, पीएच.डी.साठी ४० वर्षे कमाल वयोमर्यादा आहे. भारतीय आयुविज्ञान परिषदेच्या संकेतस्तळावरील एमडी, एमएस अभ्यासक्रमच प्रवेशासाठी पात्र असतील.२०२३-२४ या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकडून परदेश शिष्यवृत्तीसाठी अर्जांसाठी २० जून ही अंतिम मुदत होती. मात्र अर्जासाठी मुदतवाढ देण्याच्या मागणीनुसार मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. http://www.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरील रोजगार या दुव्यावरून अर्ज डाऊनलोड करून तो ५ जुलैपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह समाज कल्याण आयुक्तालय ३, चर्च पथ, महाराष्ट्र राज्य, पुणे- ४११००१ या पत्त्यावर सादर करणे आवश्यक आहे.