जळगाव : फ्रान्स, म्यानमारमधील भारतीय वंशजाच्या लोकांची जागतिक संस्था असलेल्या ‘गोपियो’ संघटनेतर्फे शास्त्रीय नृत्य भरतनाट्यम व भारतीय संस्कृती या विषयावर स्पर्धा घेण्यात आल्या. यात कासोदा येथील मूळ रहिवासी असलेल्या व म्यानमारमध्ये १२ वीचे शिक्षण घेत असलेल्या सानिका सचिन बियाणी (वय १७) हिने उत्तम सादरीकरण करीत द्वितीय क्रमांक पटकावला. फ्रान्समधील भारतीयांचे वैश्विक संघटन असलेल्या कैरिबियन बेटांजवळील फ्रान्सिस क्षेत्रातील गुआदेलूप बेटावर ऑक्टोबर महिन्यात इंटरनॅशनल अॅम्बेसेडर २०२२ या प्रतियोगितेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत १५ देशांमधील भारतीय स्पर्धकांनी भाग घेतला होता. यात सर्व स्पर्धकांनी शास्त्रीय नृत्य भरतनाट्यम आणि भारतीय संस्कृतीवर भाषण देत, नृत्य सादर केली. या वेळी सानिका बियाणी हिने महाभारतातील काही प्रसंग आपल्या भरतनाट्यातून सादर करीत भारतीयांची वेगळीच छाप पाडली. सानिकाने आपल्या भरतनाट्म कौशल्यातून दर्शकांना मंत्रमुग्ध केले. उत्कृष्ट सादरीकरणामुळे सानिका बियाणी हिने म्यानमारचे प्रतिनिधित्व करीत दुसऱ्या क्रमांकावर स्थान पटकावले. याबद्दल तिला ट्रॉफी, प्रमाणपत्र व मुकुट देण्यात आला.
नृत्यातच करिअर करणार : यूट्यूबवरून शास्त्रीय संगीत व भरतनाट्यमचे प्रशिक्षण घेत मी सराव केला. बारावीनंतर पुणे येथे येऊन भरतनाट्यम क्षेत्रात करिअर करण्याचा मानसही सानिकाने व्यक्त केला. सचिन गेल्या १२ वर्षांपासून म्यानमारमधील ल्युपिन फॉर्मास्युटिकल कंपनीत हेड म्हणून काम पाहत आहेत. ती कासोदा येथील डॉ. अशोक जी. बियाणी यांची नात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्यानमारमध्ये घेतली भेट भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २०१४ मध्ये म्यानमारच्या भेटीस गेले असताना एका कार्यक्रमात बियाणी कुटंुबीयांची मोदींनी भेट घेत आपली माहिती जाणून घेतली असल्याचेही सानिकाचे वडील सचिन बियाणी यांनी सांगितले. सानिका व तिचे कुटुंबीय १२ वर्षांपासून म्यानमार मध्ये राहत आहेत. सानिकाने आपल्या आई सोनाली सोबत ही दहा दिवसांची फ्रान्सची यात्रा केली होती. यात पॅरिसचा एक दिवसाचा दौराही होता. या वेळी म्यानमारमधील भारतीय राजदूत श्रीविनयकुमार यांनीही सानिकाचा सन्मान केला. यासह हॉटेलसह पूर्ण यात्रेचे प्रायोजकत्व केले असल्याची माहितीही सचिन बियाणी यांनी दिली.