जळगाव : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीपाठाेपाठ आता जिल्हा सहकारी दूध संघाच्या निवडणुकीवरून राष्ट्रवादी काँग्रेसमधील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. आमदार एकनाथ खडसेंच्या विराेधात गेलेला दुसऱ्या गटावर अंतर्गत अविश्वासाचे वातावरण असल्याने ही धगधग बाहेर येण्याच्या स्थिती आहे. दरम्यान, जिल्हा बँक अध्यक्षपदाचे राजकारण या महिन्यात पुढे येणार असल्याने या वेळी पक्षातील गटबाजी पुन्हा एकदा पुढे येण्याची शक्यता आहे.
जिल्हा बंॅकेच्या अध्यक्ष निवडीवेळी राष्ट्रवादीच्या जुन्या नेत्यांनी आमदार खडसेंविराेधात भूमिका घेत गुलाबराव देवकर यांना अध्यक्षपदी बसवले हाेते. या वेळी झालेल्या राजकारणामुळे पक्षातील गटबाजी पुढे आली हाेती. जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण हाेत असल्याने याच महिन्यात बँकेचे राजकारणही तापणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीतील गुलाबराव देवकर, डाॅ. सतीश पाटील यांचा गट दूध संघाच्या निवडणुकीत आमदार खडसेंसाेबत आहे. याचवेळी बँकेचे संचालक संजय पवार हे भाजप-शिंदेसेनेच्या पॅनलमध्ये दाखल झाले आहेत. त्यांच्यासाेबत माजी आमदार दिलीप वाघ हे देखील आहेत. दूध संघाची निवडणूक लांबणीवर पडली असतांना राष्ट्रवादीत राजकारणाचा अंक सुरू हाेण्याची शक्यता आहे.