नाशिक : भगवतगीतेमध्ये सांगितले आहे, जीवनात यशस्वी होण्यासाठी उत्साह व धैर्य वाढले पाहिजे. संकटात न डगमगता आपले काम करीत जावे. हे धैर्य आणि सामर्थ्य प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी यांनी समर्थपणे पेलले. संस्थेच्या विविध जबाबदाऱ्या उत्साहात पार पाडल्या. नवीन पर्वही अधिक जोमाने घेतलेले कार्य पुढे करत राहतील, असे गौरवोद्गार गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. मो. स. गोसावी यांनी केले. गोखले एज्युकेशन सोसायटीचे विभागीय सचिव व बीवायके महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी हे प्रदीर्घ सेवेनंतर प्राचार्य पदावरून नुकतेच सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्ताने प्रिं. टी. ए. कुलकर्णी हॉलमध्ये अष्टावधानी या गौरव ग्रंथ प्रकाशनाचा सोहळा व सत्कार आयोजित करण्यात आला. याप्रसंगी ते कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलत होते. व्यासपीठावर एच.आर. डायरेक्टर प्राचार्या डॉ. दीप्ती देशपांडे, गौरवग्रंथ समितीप्रमुख डॉ. के. आर . शिंपी, प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी व नीता कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. नेहा देशपांडे हिने स्वागतगीत सादर केले. डॉ. के. आर. शिंपी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यानंतर गौरव समिती वतीने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. सागर कुलकर्णी व डॉ. लीना भट यांनी स्वागत केले. त्यानंतर डॉ. मो. स. गोसावी व डॉ. दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते अष्टावधानी या गौरव ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी प्राचार्य डॉ. व्ही. एन. सूर्यवंशी, वैभव सरोदे, विनोद देशपांडे, सागर कुलकर्णी यांनी प्रातिनिधिक मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. स्नेहा रत्नपारखी यांनी केले तर आभार डॉ. एस. आर. खंडेलवाल यांनी मानले.