नाशिक : खंडेराव टेकडी येथे चंपाषष्ठी यात्राेत्सवानिमित्त बुधवारी (दि.३०) कुस्त्यांची दंगल झाली. यात घोटीच्या तुषार घारेने भगूरच्या सिद्धेश गायकवाड या पहिलवानाला चितपट करत तुल्यबळ लढतीत विजय मिळविला. भगूर, साकुर, सिन्नर, पिंपळगाव खांब, नगर, अकोला, घोटी, बेलू, नाशिक आदी भागातील मल्लांनी हजेरी लावली. २१ रुपयांपासून दाेन हजारांपर्यंतच्या कुस्त्यांमध्ये एकेरीपट, सकी, आकडी, टांग, झोळी ढाक, कलेजांग, बांगडी, घिस्सा आदी डावपेच कुस्ती शौकिनांना अनुभवायला मिळाले.यावर्षी शिंगवे बहुला येथील वस्ताद स्व.पै.पंढरीनाथ पाळदे यांच्या स्मरणार्थ २१०० रुपये कुस्तीचा मानकरी घोटी येथील तुषार घारे ठरला.
त्याने याचा टांग डाव टाकत सिद्धेश गायकवाडचा पराभव केला. छोट्या गटातील कुस्त्या अतिशय प्रेक्षणीय ठरल्या. स्पर्धेतील अंतिम विजेता ठरलेला तुषार घारे यास मंदिराचे विश्वस्त प्रकाश आमले,उत्तम मांडे, सहायक पोलिस निरीक्षक राहुल मोरे, वस्ताद भाऊसाहेब मोजाड, प्रवीण पाळदे, सरपंच मोहनीष दोंदे, पोलिस शाम कोटमे, भारत वाघमारे मंगेश करंजकर, नाना पगारे, ओमकार शिरोळे आदी मान्यवरांच्या हस्ते पहिलवान चषक व रोख पारितोषिक, श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. पंच म्हणून नितीन आमले, प्रवीण पाळदे, भाऊसाहेब मोजाड, गणेश सूर्यवंशी, विजय गामने आदींनी काम बघितले.यशस्वितेसाठी प्रकाश आमले, सतीश म्हस्के,नितीन आमले, अथर्व आमले, विजय निसाळ, आदी प्रयत्नशील होते. मंगळवारी रात्रभर झालेल्या जागरण, गोंधळाच्या कार्यक्रमानंतर बुधवारी पहाटे मंदिर विश्वस्तांच्या हस्ते लंगर तोडण्यात आला. परतीच्या यात्रेसाठी खंडेराव भक्त उत्तम मांडे यांच्या हस्ते आरती करण्यात आली.