अमरावती, दि. 17 : कोविड प्रतिबंधासाठी उपचार, जनजागृती, आवश्यक तिथे प्रतिबंधात्मक कारवाया, लसीकरण आदींमध्ये सातत्य राखावे. त्याचबरोबर, कायमस्वरूपी सक्षम आरोग्य यंत्रणा उभारण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करावे. नागरिकांनीही साथीचे गांभीर्य ओळखून नियमांचे काटेकोर पालन करावे व अद्यापही लस न घेतलेल्यांनी लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे केले. जिल्ह्यातील कोविड प्रतिबंधक उपाययोजनांचा जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेताना त्या बोलत होत्या. जिल्हाधिकारी पवनीत कौर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ, मनपा आयुक्त प्रवीण आष्टीकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बिजवल, उपविभागीय अधिकारी डॉ. नितीन व्यवहारे व वैद्यकीय यंत्रणेचे अनेक अधिकारी आदी यावेळी उपस्थित होते. कोविड उपचार, लसीकरण, दंडात्मक कारवाया, विविध रुग्णालयांतील सुविधा आदी विविध बाबींचा सविस्तर आढावा पालकमंत्र्यांनी आजच्या बैठकीत घेतला. त्या म्हणाल्या की, कोविड प्रतिबंधासाठी आवश्यक यंत्रणा सुसज्ज करण्यात आली आहे. तथापि, गत दोन वर्षांपासून कोविड साथीची झळ आपण अनुभवत आहोत. यानंतरही काही नागरिकांकडून अद्यापही नियमांचे पालन होत नसल्यास कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. ‘वीकली पॉझिटिव्हिटी रेट’ हा अमरावती जिल्ह्यात 12 टक्क्यांवर गेला आहे. त्याचे गांभीर्य ओळखून नियमांचे काटेकोर पालन आवश्यक आहे. काही नागरिक सातत्याने उल्लंघन करत असल्याचे आढळले, तर त्यांच्याकडून बाँड लिहून घेतला पाहिजे. सार्वजनिक ठिकाणी गर्दीवर नियंत्रण ठेवा. बेशिस्त व्यक्तींमुळे साथ वाढते आणि नियमपालन करणा-या नागरिकांनाही त्याचे तोटे सहन करावे लागतात. असे घडता कामा नये. त्यामुळे प्रतिबंधात्मक कारवायांत सातत्य ठेवण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
मेळघाटात लसीकरण वाढण्यासाठी व्यापक प्रयत्न करा
लसीकरणात सातत्य राखण्यासाठी आवश्यक लस उपलब्ध असण्याच्या दृष्टीने सजग राहावे. मेळघाटात लसीकरणाचे प्रमाण वाढवणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने व्यापक प्रयत्न व्हावेत. दुस-या मात्रेसाठी पात्र नागरिकांचे विहित वेळेत लसीकरण होणे आवश्यक आहे. दुस-या मात्रेचे लसीकरण वाढवावे व नागरिकांनीही लसीकरणासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले. 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण होत आहे. त्यानुसार सध्या कोव्हॅक्सिनच्या 42 हजार मात्रा उपलब्ध झाल्या आहेत. त्यानंतरही लसीकरणातील सातत्याच्या दृष्टीने आवश्यक साठ्याबाबत नियमित पाठपुरावा व्हावा, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. जिनोम सिक्वेन्सिंगसाठी विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत यंत्रणा निर्माण करण्याचा प्रस्ताव आहे. यासंबंधी सर्व तांत्रिक बाबी तपासून व आवश्यक मान्यता मिळवून कार्यवाही करावी. सध्या अशा तपासणीसाठी पुणे व दिल्ली येथे नमुने पाठविले जातात. येथे यंत्रणा उभी राहिल्यास अनेक जिल्ह्यांना फायदा होणार आहे. त्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिली. मिशन वात्सल्य व अनाथ संगोपन योजनेचा आढावा पालकमंत्र्यांनी घेतला. त्या म्हणाल्या की, महसूल व इतर यंत्रणांनी या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी. गरजूंपर्यंत पोहोचून त्यांना लाभ मिळवून देणे आवश्यक आहे. एकही पात्र व्यक्ती वंचित राहता कामा नये. कोविडबाधितांचा मृत्यू झाल्यास कुटुंबियांना द्यावयाच्या मदतीबाबत प्रकरणांचा आढावाही त्यांनी घेतला. त्यानुसार जिल्ह्यात 1256 अर्ज मंजूर झाले असून, शासन स्तरावरून मदत संबंधित अर्जदारांच्या खात्यात जमा होत असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी श्री. बिजवल यांनी सांगितले. जिल्हा रुग्णालयात प्रमाणपत्र मिळवून देण्याच्या नावाखाली गैरव्यवहार होत असल्याच्या तक्रारी आहेत. असे प्रकार खपवून घेतले जाता कामा नये. याबाबत सखोल तपास करावा व हे प्रकार तत्काळ थांबवून दोषींवर कारवाई करावी. पोलीसांनीही अशाप्रकरणी तपास करून अपप्रकार थांबवावेत. रुग्णालयात पारदर्शक यंत्रणा निर्माण करावी, असे सुस्पष्ट निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.