अविनाश पोहरे / ब्युरो चिफ, अकोला
“श्री गणपती हे ज्ञानाचे प्रतीक आहे त्यांचा उत्सव हा कला, शिक्षण, सांस्कृतिक कार्यक्रमच्या माध्यमातून मानवंदना वाहून साजरा व्हावा! फक्त २१ दुर्वा नको तर गावातील २१ सुवर्ण कलाकारांच्या कलेला, ज्ञानाला कौतुकाची शाबासकी देऊन त्यांच्या गळ्यात पदक घालावे, या उद्देशाने साथ सेवक फाउंडेशन च्या सर्व साथीदारांनी गावोगावी व्यक्तिमत्त्व विकास व कलागुणांना वाव देणाऱ्या स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्यामध्ये चित्रकला, निबंध, सामान्यज्ञान, रांगोळी, कलाकृती, वक्तृत्व, वेशभूषा, सुदंर माझे मास्क, अशा सुप्तगुणांना वाव देणाऱ्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
चित्रकला स्पर्धे मध्ये १) वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन २) सुंदर माझी शाळा ३) शेती, शेतकरी,वास्तव ४) स्वच्छ सुंदर प्रदूषण मुक्त गाव असे विषय देण्यात आले.निबंधस्पर्धा मध्ये 1.मला अपेक्षित शाळा, 2.कोरोनाने आम्हाला काय शिकवले, 3.माझ्या स्वप्नातील गाव, 4.माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा.
तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा काय असते हे माहिती व्हावे व अधिकारी घडावे या उद्देशाने सामान्य ज्ञान परीक्षा घेण्यात आली. महिलांना आपल्या रांगोळी कलेचे प्रदर्शन करता यावे या करिता रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले. ग्रामीण भाग हा कलागुणांचा पाया आहे म्हणून कलाकृती स्पर्धेचे नियोजन टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनविणे व आपल्या कौशल्याने कोणतीही वस्तू तयार करून प्रदर्शन मांडण्यात आले. वेशभूषा, सुंदर माझे मास्क, गाव हा विश्वाचा नकाशा आहे त्या ग्रामीण भागाचे प्रश्न मांडता यावे गाव बोलके व्हावे या उद्देशाने भाषण स्पर्धा घेऊन राष्ट्रनिर्माण व्हावे ज्या मध्ये 1.भारत माझा देश आहे 2. गाव हा विश्वाचा नकाशा 3. माझा बाप शेतकरी 4 .माय मायेची छाया,बाप भविष्याचा पाया 5. व्यसनाची घाण झुकवेल मान, भविष्याच्या वाटचालीचे विषय देऊन गावकऱ्यांनीच विचारांची मेजवानी गावकऱ्यांना दिली. मूर्तीजापूर, तेल्हारा,बार्शीटाकळी, पातूर, अकोला तसेच या तालुक्यातील विराहित, चोंढी, चारमोळी, शिलोडा या गावांमध्ये २१ पदकांचा गणेशोत्सव उत्साहाने साजरा करण्यात आला. प्रत्येक सहभागी स्पर्धकाला प्रमाणपत्र व विजेत्यांना सुवर्ण, रजत, कांस्य पदक देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या स्पर्धांचे आयोजन करण्यामध्ये विविध गावातील साथ सेवक फाउंडेशन च्या सर्व साथीदारांनी अथक परिश्रम घेऊन सार्वजनिक गणेशोत्सवाला एक नवी आदर्श दिशा देण्याचा प्रयत्न केला आहे. श्री गणेशाचा असा २१ पदकांचा गणेशोत्सव गावा-गावात व्हावा असा सूर समाजातून येतोय.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा कशा असतात हे कुठेही पाहायला मिळत नाही सोबतच सहभागी सुद्धा होता येत नाही. म्हणून त्यांना स्पर्धेची ओळख व्हावी. भविष्यातील अधिकारी, कलाकार, लेखक, वक्ता, चित्रकार घडावे हाच उद्देश.
अजय कवडे
साथीदार, साथ सेवक फाउंडेशन
नाच-गाणे धिंगाने घालून गणेशोत्सव साजरा करण्याची नवीनच प्रथा समाजात असतांना, गाव तसेच विद्यार्थी हे देशाच भविष्य आहे. त्यांना व्यक्तिमत्त्व विकासाच्या मार्गाने राष्ट्रउन्नतीची शिकवण देणारे आयोजन साथ सेवक फाउंडेशन करत असल्याचा अभिमान आहे.
सौ.दीपिका देशमुख
संचालिका, सूर्योदय महिला उद्योग
गणपती बाप्पा म्हणजे ६४ गुणांचा अधिपती आहे. तर मग त्यांचा उत्सव ज्ञान दान, कलागुणांना वाव देऊन साजरा करण्याच्या उद्देशाने सुरू केला आहे. येणाऱ्या काळात गणेशोत्सव मंडळाने या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करावा. साथ देण्यासाठी साथ सेवक फाउंडेशन सोबत असेल.
अक्षय राऊत
साथीदार- साथ सेवक फाउंडेशन