सुधीर जाधव,
जिल्हा प्रतिनिधी, सातारा.
सातारा : जिल्ह्याला ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि भौगोलिक मोठा वारसा लाभला आहे. सातारा जिल्ह्यातल्या बारवा तर खूपच वैशिष्ट्यपूर्ण आहेत. त्यातल्याच एका सातारा शहराच्या मध्यवस्तीत असणाऱ्या बाजीराव विहिरीला एक मोठा सन्मान मिळाला आहे. केंद्रीय डाकघर विभागाने महाराष्ट्रातल्या काही वैशिष्ट्यपूर्ण बारवांचे पोस्टकार्ड प्रसिद्ध केले. त्यात साताऱ्याच्या बाजीराव विहिरीचे पोस्ट कार्ड पण प्रसिद्ध झाले. राष्ट्रीय पोस्ट दिनानिमित्त महाराष्ट्रातील आठ हेरिटेज स्टेपवेलचे पोस्टकार्ड्स आणि माहिती पुस्तिकेचे पॅक मुख्य पोस्टमास्टर जनरल, महाराष्ट्र सर्कलद्वारे बुधवार, ११ ऑक्टोबर २०२३ ला प्रकाशित करण्यात आले आहेत.
महाराष्ट्रातील आठ हेरिटेज स्टेपवेलचे पोस्टकार्ड्स आणि माहिती पुस्तिकेचे पॅक मुख्य पोस्टमास्टर जनरल, श्री के के शर्मा, महाराष्ट्र सर्कल आणि श्री अमिताभ सिंग, पोस्ट मास्तर जनरल, महाराष्ट्र पोस्टल सर्कलद्वारे जारी केले आहे आणि त्यांची माहिती नमूद केली आहे. परभणी जिल्हा : आर्वी, चारठाणा, पिंगळी आणि वालूर (आर्किटेक्चरल डिझाईन: सीटीईएस कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, मुंबई). अमरावती जिल्हा: महिमापूर (आर्किटेक्चरल डिझाईन : पीआर पोटे कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, अमरावती). सातारा जिल्हा: बाजीराव विहीर, सातारा (आर्किटेक्चरल डिझाइन: एमआयटी स्कूल ऑफ आर्किटेक्चर, पुणे). पुणे जिल्हा: मंचर (आर्किटेक्चरल डिझाइन: सिंहगड कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, पुणे).नाशिक जिल्हा: गिरनारे (आर्किटेक्चरल डिझाइन: नीव डिझाईन्स, नाशिक).
साताऱ्याच्या दृष्टीने नक्कीच हा क्षण अभिमानाचा आहे. महाराष्ट्र बारव संवर्धन समितिचे संस्थापन आणि समन्वयक रोहन काळे यांनी याकामी पुढाकार घेतला. विविध आर्किटेक्ट कॉलेज, स्थानिक लोक यांच्या बरोबर काम करून बारवा पुनरुज्जीवन करण्याचे काम सध्या सुरु आहे. महाराष्ट्र बारव मोहिमे अंतर्गत लोकसहभागातून महाराष्ट्रातील २००० स्टेपवेलची अचूक ठिकाणे यशस्वीरित्या मॅप केली आहेत आणि त्यांची माहिती www.indianstepwells.com या वेबसाइटवर उपलब्ध आहे. हेलिकल, L-आकार, Z-आकार, शिवपिंडी आकार, चौकोनी / आयताकृती आकार अशा विविध वास्तू स्वरूपातील आहेत परंतु त्यांचे आकार, वापरलेली सामग्री आणि पाण्याची साठवण क्षमता भिन्न आहे . साताऱ्याच्या बाजीराव विहीर संवर्धनाच्या कामात राजेश कानिम नेहमीच सक्रिय आहेत.