मनोज भगत
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा : अवनीतलावरील इतर देशांच्या तुलनेत भारतीयांच्या पूर्वजांनी निर्माण करून ठेवलेली ग्रंथसंपदा ही अमापच आहे हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे त्यातही स्वातंत्र्यपूर्वकाळात परकीय आक्रमकानी आपल्या आर्थिक संपत्ती बरोबरच आध्यात्मिक संपत्तीचे ही हरण केले तरीही आज आपल्याजवळ कधीही न संपणारी गंगाजळी स्वरूप अभंग ग्रंथसंपदा आहे त्यातील बरेच ग्रंथ एखाद्या व्यक्तीपात्राच्या प्रेमापोटी निर्माण झालेले असून , बहुतांश ठिकाणी सोपा विषय कठीण करून सांगितला असल्यामुळे त्या ग्रंथांमध्ये लेखकाच्या विद्वत्तेची झलक अभ्यासकांच्या निदर्शनास येते . परंतु ग्रंथराज ज्ञानेश्वरी हा ग्रंथ केवळ श्रीमद्भगवद्गीतेवरील किंवा भगवान श्रीकृष्णांवरील प्रीती पोटी व स्वतःची विद्वत्ता मिळवण्याकरता निर्माण झालेला नसून ; अखिल विश्वाला आनंदाचे आवरू ( कोट )मांडण्यासाठी भगवान श्री ज्ञानराजांच्या आत्मप्रतीतून निर्माण झालेला जगदमान्य अद्वितीय स्वरूप ग्रंथ असल्याचे महत्त्वपूर्ण प्रतिपादन ज्ञानेश्वरीचे निष्ठावंत उपासक ज्ञानेश्वर महाराज वाघ यांनी केले.
ते आज संत श्री वासुदेवजी महाराज स्मृती मंदिर ज्ञानेश आश्रम वारी भैरवगड येथील पुरुषोत्तम मास सप्ताहातील ज्ञानेश्वरी भावनिरुपणाच्या तिसऱ्या सत्रात बोलत होते.
संतांची प्रतीति ही बरेचदा त्यांच्या प्रत्यक्ष वाणीतून किंवा त्यांच्या कृतीतून प्रगट होत असते. अर्थात संत हे बरेचदा आपल्या धारदार वाणीने समाजाला धारेवर धरत असतात . परंतु बरेचदा समाज सांगूनही ऐकत नाही त्यावेळी समाजाची अनुकरण शीलता ओळखून समाजाने जे करावे ते स्वतः आचरणात आणून अनुकरणशील त्याच्यांकडून ते करून घेतात . असे सौदाहरण महाराजांनी पटवून दिल्याचे श्री ज्ञानेश्वर महाराज भालतिलक हे कळवितात.


