खामगाव : गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यातील काही मंडळात अतिवृष्टी झाली असून यामुळे शेत पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना पालकमंत्री यांनी दिल्या होत्या. त्यावेळी मेहकर व लोणार तालुक्यातच अतिवृष्टीचा फटका शेतकऱ्यांना बसला होता. ते होत नाही तर गेल्या चोवीस तासात खामगाव तालुक्यासह मेहकर तालुक्यातील जानेफळ परिसरातही कोसळधारांमुळे सोयाबीन पाण्यात गेल्याने शेतकऱ्यांचा अश्रुुंचा बांध फुटला आहे.
जिल्ह्यात १० ऑक्टोबर रोजी झालेल्या सर्वत्र पावसामुळे मेहकर तालुक्यातील मेहकर व नायगाव मंडळात १०७ मिमी, तर लोणार तालुक्यातील सुलतानपूर मंडळात १०५ मिमी पावसाची नोंद झाली होती. या अतिवृष्टीमुळे दोन तालुक्यातील सुमारे १९ हजार ६५ हेक्टर आर शेती पिकाचे नुकसान झाले होते. तर आज जानेफळ मंडळात ६५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. विजेच्या गडगडाटासह मुसळधार पावसाने थैमान घातले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. शेतकऱ्यांच्या हाती असलेले सोयाबीनचे पीक धोक्यात आले असून सर्वत्र शेतात पाणी साचल्याने आता सोयाबीनचे पीक हातातून जाते की काय अशी भीती शेतकऱ्यांमध्ये आहे. त्यामुळे दिवाळीच अंधारात जाते की काय अशी स्थिती झालेली आहे. असे असताना सुद्धा महसूल विभागाची जाचक अट असल्यामुळे नुकसान होत असल्याचे चित्र असतानाही त्या नुकसानीस संबंधित शेतकरी पात्र होऊ शकत नाही.
६५ मिमी पावसाची अट नुकसानीस पात्र नाही; शेतकऱ्यांमध्ये चिंता महसूल विभागाच्या निकषानुसार ६५ मि. मि.च्या वर पाऊस नसल्याने ते सर्वे साठी पात्र होऊन मदतीसाठी पात्र होऊ शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्याची चिंता वाढल्याने लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन संबंधित शेतकऱ्यांचे नुकसान झाले असेल तर सर्वेचे आदेश देऊन त्यांच्या नुकसानीचा पंचनामा करून मदत करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. अशा प्रकारचा निकष त्या शेतकऱ्यांसाठी योग्य नसल्याच्या प्रतिक्रियाही उमटत आहेत.
शासनाने नुकसानीचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना मदत द्यावी ^जानेफळ येथील भाग क्रमांक २ गट नंबर २५६ मध्ये माझे २.४२ हेक्टर आर क्षेत्रावर पेरणी करुन चार महिने झाले आहे. सतत पडत असलेल्या पावसामुळे शेतातील सोयाबीनचे पिक शेतातील साचलेल्या पाण्यामुळे सोंगता न आल्याने खराब होऊन नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. तरी शासनाने ज्या शेतकर् या चे नुकसान झाले आहे त्यांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना ताबडतोब मदत करावी. -शेख शफी शेख युसूफ, शेतकरी, जानेफळ
शेतातील साचलेल्या पाण्याची थट्टा : मोठ्या प्रमाणात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे जानेफळ परिसरात नुकसान होत आहे. मात्र तहसीलदार, मंडळ अधिकारी व तलाठी हे शेतकऱ्यांबाबत कायम उदासीन असल्याचे चित्र दिसत आहे. शेतात साचलेल्या पाण्याचा फोटो वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर महसूल विभागाकडून अशी स्थिती आपल्याला बघायला मिळेल का ? अशी थट्टा करणारी प्रश्न विचारली जात आहे.


