सुमित सोनोने
तालुका प्रतिनिधी,मुर्तिजापूर
मुर्तिजापूर : तालुक्यातील सांगवी येथील जिल्हा परिषद शाळेची इमारत क्षितिग्रस्त झाल्याने दोन ते तीन वर्षांपूर्वी पाडण्यात आल्याने येथील विद्यार्थीच नव्हे, शिक्षकांसाठीही तापदायक झाली आहे.गेल्या दोन ते तीन वर्षांपासून मूर्तिजापूर तालुक्यातील सांगवी येथे जिल्हा परिषदेच्या शालेची इमारतच नसल्याने गावातील हनुमान मंदिरात शाळा भरत आहे. तर तालुक्यात अनेक जिल्हा परिषद शाळेच्या वर्गखोल्या, शाळेचे इमारत जीर्ण झाल्या असून, नवीन वर्गखोल्यांची मागणी करूनही जिल्हा परिषदेचे दुर्लक्ष पालकांमध्ये संताप निर्माण करीत आहे.जिल्हा परिषद अंतर्गत मूर्तिजापूर तालुक्यात 142 शाळा आहेत, इयत्ता पहिली ते आठवी पर्यंत 6 हजार 694 विद्यार्थी आणि 399 शिक्षकांची नोंद आहे. प्रत्यक्ष तालुक्यातील 33 शाळांच्या वर्गखोल्या नादुरुस्त, पडक्या असून, शिकस्त झाल्या आहेत मात्र 33 पैकी एकाच शाळेचा इमारत शिकस्त झाल्याचा अहवाल शिक्षण विभागाकडे प्राप्त झाला आहे. नवीन वर्गखोल्यांची मागणी वारंवार करूनही जिल्हा परिषदेचे दुर्लक्ष विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतणारे ठरले आहे. मूर्तिजापूर पंचायत समिती व जिल्हा परिषद कडे सांगवी जिल्हा परिषद शाळेची फाईल गेल्या दोन वर्षांपासून पडून आहे. मात्र ग्रामपंचायत सांगवी व शाळेच्या वतीने कागदपत्रांची पूर्तता करुनही शासनाच्या वतीने या कडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत कासव गतीने काम सुरू असल्याचे दिसते.यामुळे मात्र मंदिर आणि शाळेची घंटा सोबतच वाजत असल्याचे पाहाव्यास मिळते.सांगवी येथील जिल्हा परिषद शाळेची इमारत दोन वर्षांपूर्वी पाडण्यात आली. आता गावात नवीन शाळा इमारत होईल, ही नागरिकांची अपेक्षा फेल ठरली.मागील दोन वर्षांपासून गावातील शाळा हनुमान मंदिरात भरते. मंदिर आणि शाळेची घंटा सोबतच वाजते. पहिली ते पाचवी पर्यंत विद्यार्थी एकत्र सांगवी येथील हनुमान मंदिरातील हॉल मध्ये भरत असल्याने सर्व वर्ग एकत्र बसविण्यात येत आहे. सांगवी येथे पहिली ते पाचवी पर्यंत 25 विध्यार्थी आहेत.शाळा इमारत नसल्याने विद्यार्थी संख्याही मोठ्या प्रमाणात रोडावली आहे.
” सांगवी शाळेच्या वतीने शाळेची इमारत शिकस्त झाल्याचे पत्र पाठवण्यात आले व त्याप्रमाणे शाळेची इमारत पाडण्यातही आली, शाळेच्या नवीन इमारती करितात प्रस्ताव पाठवण्यात आले व तसे चलान भरून कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली. परंतु अद्यापही इमारत बांधकाम झाली नसल्याने हनुमान मंदिरातील सभागृहात शाळा भरावी लागते”.
– विलास अवघाते
मुख्याध्यापक
जि.प.प्राथ.शाळा सांगवी
” नवीन इमारत बांधकाम करिता संबंधित विभागाकडून प्रस्ताव प्राप्त होतात, त्यानंतर आम्ही त्याचे इन्स्ट्रुमेंट तयार करतो व निधी मंजूर केल्या जातो, त्यावर प्रशासकीय मान्यता मिळाल्यावर पुढील कार्यास सुरुवात केली जाते परंतु अद्यापही शिक्षण विभागाकडून प्रशासकीय मान्यतेचे पत्र आलेले नाही”.
– प्रकाश दे.उमाळे
उपविभागीय अभियंता
जि.प.बांध. उपविभाग मूर्तिजापूर
जि.प.सांगवी च्या शाळेची इमारत शिकस्त असल्याचे बांधकाम विभागाच्या वतीने पत्र प्राप्त झाले होते. त्याअनुषंगाने इमारत पाडण्यात आली, नवीन इमारत करिता जिल्हा वार्षिक योजनेतून निधी(डी.पी.डी.सी) मंजूर करण्यात आला आहे. परंतु संपूर्ण बांधकाम करण्याची जिम्मेदारी जि. प. बांधकाम विभागाची व जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची असून यात शिक्षण विभागाची भूमिका कमी आहे.
– संजय मोरे
गट शिक्षणाधिकारी
पं.स.मुर्तीजापुर