मोहन चुन्ने
तालुका प्रतिनिधी लाखांदूर
लाखांदूर : दि.२० सप्टेंबर रोजी तलावावर मासे पकडायला गेलेल्या एका ४५ वर्षीय इसमाला वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना लाखांदूर तालुक्यात घडली असून दि.२१ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील इंदोरा जंगल परिसरात उघडकीस आली. विनय खगेल मंडल वय ४५ वर्षे रा. अरूणनगर ता.अर्जुनी/मोर. जिल्हा गोंदिया असे घटनेतील मृतक इसमाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, गोंदिया जिल्ह्यातील अरूणनगर तर भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील इंदोरा हे गाव दोन्ही जिल्ह्यांच्या सीमे लगतचे गाव आहेत. त्यामुळे, या दोन्ही गावातील ग्रामस्थांचा कुठल्या ना कुठल्या कारणाने एक दुसऱ्या जिल्ह्यातील गावात येण्याचा प्रसंग पडतो. अश्याच प्रसंगी स्थानिक अरूणनगर येथील रहिवाशी विनय मंडल हा दि.२० सप्टेंबर रोजी काही कामानिमित्त भंडारा जिल्ह्यामध्ये लाखांदूर तालुक्यातील इंदोरा येथे आला होता. दरम्यान, घटनेतील मृत विनय मंडल हा लाखांदूर वन परिक्षेत्रा अंतर्गत पूयार बीट क्र.३२१ मधील इंदोरा जंगल परिसरातील तलावात मासे पकडण्यासाठी गेला. मात्र, जंगल परिसरात मासे पकडणे सदर इसमाच्या जीवावर बेतले. मासे पकडण्यासाठी गेलेल्या सदर इसमावर एका वाघाने हल्ला करीत त्याला ठार केले. घरून निघालेला व्यक्ती त्या दिवशी घरी परतलाच नसल्याने कुटुंबीयांनी त्याची शोधाशोध सुरू केली असता काल दि.२१ सप्टेंबर रोजी लाखांदूर तालुक्यातील इंदोरा येथील जंगल परिसरात सदर व्यक्तीचा मृत शरीर अर्धा खाल्लेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेची माहिती लाखांदूर वनविभागासह लाखांदूर पोलिस प्रशासनाला देण्यात आली. यावरून लाखांदूर पोलिस अधिकारी कर्मचारी व येथील वनपरिक्षेत्राधिकारी रुपेश गावित यांचेसह वन कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा केला. ही घटना वाऱ्यासारखी तालुक्यात पसरताच घटनास्थळी बघ्यांनी एकच गर्दी केली होती. दरम्यान, वन विभागाने घटनेतील मृत विनय मंडल यांचेवर वाघाने हल्ला करून ठार केल्याचे स्पष्ट केले. सदर घटनेमध्ये मृतकाच्या परिवाराला आर्थिक मदत देण्याची मागणी जनतेकडून केली जात आहे . हल्ला करून इसमास ठार करणारा वाघ चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, जिल्ह्यातील तब्ब्ल बारा जणांचा बळी घेणारा सी टी -1असल्याचे गृहीत धरून त्या वाघास जेरबंद करण्यासाठी वन विभाग त्याचं जंगलात तळ ठोकून मोहीम राबवित असल्याची माहिती आहे.


