संजय शिंदे
जिल्हा प्रतिनिधी पुणे
नोंदीचे काम करून देण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या एका खासगी इसमाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) सापळा रचून रंगेहाथ पकडले. ही कारवाई सोमेश्वर पेट्रोलपंप परिसरातील गायकवाड बिल्डिंगजवळ करण्यात आली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सोमनाथ संपत महानवर (वय ३५, रा. गडदरवाडी, पोस्ट खंडोबाचीवाडी, ता. बारामती) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्र. ४०/२०२६ अन्वये भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलम ७(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तक्रारदार यांच्या सातबारा नोंदी सर्कल कार्यालयातून प्रमाणित करून देण्यासाठी सर्कल अधिकारी मोहिते यांच्यासाठी २० हजार रुपये व तलाठी जयश्री तनपुरे यांच्यासाठी ५ ते ६ हजार रुपये अशी लाचेची मागणी केल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. त्यानुसार २६ फेब्रुवारी २०२६ रोजी वडगाव निंबाळकर येथील सर्कल कार्यालयात पडताळणी करण्यात आली असता लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाले.यानंतर ४ मार्च २०२६ रोजी सोमेश्वर पेट्रोलपंपाजवळील गायकवाड बिल्डिंग परिसरात सापळा रचण्यात आला. यावेळी आरोपी सोमनाथ महानवर यांनी पंचांसमक्ष तडजोडीनंतर १५ हजार रुपये लाच रक्कम स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुहास हट्टेकर करत आहेत.









