संजय शिंदे
जिल्हा प्रतिनिधी पुणे
दि. ९ ते ११ मार्चदरम्यान धार्मिक, सांस्कृतिक, हजेरी व कुस्ती स्पर्धांचा जल्लोष तक्रारवाडी (ता. इंदापूर, जि. पुणे) : तक्रारवाडी येथील जागृत देवस्थान ‘श्री राजाबाग सवार पिरसाहेब महाराज’ यांच्या यात्रा उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात असून दि. ९ ते ११ मार्च २०२६ दरम्यान हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. सर्व धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या पिरसाहेबांच्या यात्रेत हिंदू-मुस्लिम बांधव एकत्र येत असल्याने हा उत्सव सामाजिक सलोखा आणि बंधुभावाचा प्रेरणादायी संगम ठरत आहे.
यात्रेनिमित्त दि. ७ ते ९ मार्चदरम्यान ग्रंथराज नवनाथ ग्रंथ पारायण आयोजित करण्यात आले आहे. सोमवार, दि. ९ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता महाप्रसाद तर रात्री ८ ते १० या वेळेत वाद्यांच्या गजरात पारंपरिक ‘संदल’ सोहळा पार पडणार आहे. पिरसाहेबांना फुलांची चादर अर्पण करून मलिदाचा नैवेद्य दाखवण्यात येणार आहे.मंगळवार, दि. १० मार्च रोजी रात्री १० ते १२ या वेळेत फटाक्यांची आतषबाजी व छबिना आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर रात्री १२ पासून कै. तुकाराम खेडकर सह पांडुरंग मुळे मांजरवाडीकर लोकनाट्य तमाशा मंडळाचा रंगतदार कार्यक्रम सादर होणार आहे. या कार्यक्रमासाठी तमाशा प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.
बुधवार, दि. ११ मार्च रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत पारंपरिक हजेरीचा कार्यक्रम होणार असून गावासह पंचक्रोशीतील भाविक, विशेषतः ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. श्रद्धेने नवस फेडण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी भाविकांची गर्दी होत असते.सायंकाळी ४ ते ७ या वेळेत निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान रंगणार आहे. प्रथम क्रमांकासाठी ₹५१,०००, द्वितीय ₹४१,००० तसेच इतर गटांसाठी ₹३१,०००, ₹२१,००० व ₹१५,००० अशी रोख बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत. त्यानंतर रात्री ९ पासून खास महिलांसाठी ‘ऑर्केस्ट्रा स्वर संगम’ हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.यात्रेनिमित्त ग्रामपंचायत व यात्रा कमिटीच्या वतीने स्वच्छता, पाणीपुरवठा, प्रकाश व्यवस्था व सुरक्षेची योग्य ती व्यवस्था करण्यात आली असून प्रशासनाशी समन्वय साधून नियोजन करण्यात आले आहे.
चौकट
“(श्री पिरसाहेब महाराजांची यात्रा ही आपल्या गावाच्या सामाजिक ऐक्याची आणि हिंदू-मुस्लिम बंधुभावाची परंपरा जपणारी आहे. ज्येष्ठांचा आशीर्वाद आणि तरुणांचा उत्साह यामुळे हा सोहळा अधिक भव्य होत आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने स्वच्छता, पाणी, प्रकाश व सुरक्षेची सर्व आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून यात्रा उत्सव शांततेत व उत्साहात यशस्वी करावा,” असे आवाहन सरपंच शरद वाघ यांनी केले.)
सरपंच शरद वाघ
ग्रामपंचायत तक्रारवाडी










