साखर कारखान्यांच्या हंगामातील ऊस गाळपामध्ये वाढ होणे आवश्यक -हर्षवर्धन पाटील
हर्षवर्धन पाटील व भाग्यश्री पाटील यांचा शेतकऱ्यांकडून सर्वप्रथम राज्यामध्ये सर्व ऊस बिल अदा केलेबद्दल सन्मान
संजय शिंदे
जिल्हा प्रतिनिधी पुणे
देशात व राज्यामध्ये साखर कारखान्यांचे हंगामातील ऊस गाळपाचे दिवस अलीकडच्या काळात कमी होत चालले आहेत, परिणामी हंगामातील उसाचे गाळपही कमी होत चालल्याने साखर उद्योगांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. त्यासाठी उपाययोजना व नियोजन करून साखर कारखान्यांचे हंगामातील ऊसाचे गाळप वाढविणे महत्वाचे ठरणार आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी रविवारी (दि. 22) केले.शहाजीनगर (ता. इंदापूर) येथे नीरा भीमा कारखाना कार्यस्थळावर आयोजित कार्यक्रमात हर्षवर्धन पाटील बोलत होते. यावेळी नीरा भीमा कारखान्याने चालु सन 2025-26 च्या हंगामामध्ये ऊस बिलाची रु. 3101 /- प्रमाणे सर्व रक्कम राज्यात सर्वप्रथम अदा करणारा पहिला कारखाना ठरले बद्दल ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने संस्थापक हर्षवर्धन पाटील व अध्यक्षा सौ.भाग्यश्री पाटील यांचा सन्मान करण्यात आला.हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, चालु हंगामामध्ये कारखान्याने एकूण 525657 मे. टन ऊसाचे गाळप करीत दि. 10 फेब्रुवारी रोजी हंगामाची सांगता झाली. यामध्ये उसाच्या फुले 265 वाणाचे प्रमाण 85 टक्के तर को.86032 वाणाचे प्रमाण अवघे 15 टक्के आहे. या हंगामा मध्ये अधिकचे ऊस गाळप होईल असे नियोजन होते, मात्र अपेक्षेपेक्षा कमी गाळप झाले, त्या संदर्भातील कारणे दुरुस्त केली जातील.कारखान्याने केलेले 525657 मे. टन ऊसाचे गाळप हे सांघिक प्रयत्नाचे यश आहे. आगामी काळात कारखान्याला स्पर्धेत टिकून राहण्यासाठी मल्टिफीड कन्सेप्ट स्वीकारावा लागेल, त्यामुळे कारखान्याच्या उत्पन्नात वाढ होऊ शकेल. तसेच कारखान्याला कॉम्प्रेस बायो गॅस युनिट असे इतर नवीन प्रकल्पही उभारावे लागतील. कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी नोंदवलेला सर्व ऊस कारखान्याला देण्याची मानसिकता बाळगली पाहिजे. तसेच ऊस तोडणी प्रोग्रॅम काटेकोरपणे राबविण्यासाठी शेतकऱ्यांनी येत्या 28 फेब्रुवारी पर्यंत कारखान्याकडे उसाच्या नोंदी द्याव्यात, असे आवाहनही यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी केले. यावेळी भाषणात हर्षवर्धन पाटील यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना आदरांजली व्यक्त केली. तसेच इंदापूर तालुक्याच्या विकासासाठी मी, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, आप्पासाहेब जगदाळे आपण सर्वजण एकत्र आल्याचे नमूद केले.यावेळी कारखान्याच्या अध्यक्षा सौ.भाग्यश्री पाटील भाषणात म्हणाल्या, कोणतेही यश संपादन करणेसाठी व्यवस्थेमध्ये शिस्त व नियम पालन, जबाबदारीची जाणीव त्याचप्रमाणे कौशल्य व्यवस्थापन आवश्यक असते. त्याकडे लक्ष दिल्याने चालू हंगामात कारखान्याची प्रगती झाली आहे. शेतकऱ्यांना वेळेवर ऊस बिलाचा दिलेला शब्द भाऊ व वाहिनी पाळणारच आहेत, याबद्दलचा विश्वास शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाला आहे.त्या पुढे म्हणाल्या, आगामी 2026-27 च्या गळीत हंगामामध्येही शेतकऱ्यांनी गुणवत्तेचा व नोंदलेला सर्व ऊस कारखान्याला द्यावा, शेतकऱ्यांना वेळेवर ऊस बिल दिले जाईल हा अध्यक्षा म्हणून शब्द आहे. चालू हंगामामध्ये कारखान्यास सहकार्य केलेबद्दल पुणे जिल्हा बँकेचे संचालक व कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, आप्पासाहेब जगदाळे यांचे तसेच संचालक मंडळ, ऊस उत्पादक शेतकरी, ऊस तोडणी वाहतूक कंत्राटदार यांचेही अध्यक्षा सौ.भाग्यश्री पाटील यांनी भाषणामध्ये आभार व्यक्त केले. प्रास्ताविक कार्यकारी संचालक नवनाथ सपकाळ यांनी केले. याप्रसंगी लालासाहेब पवार, उदयसिंह पाटील, डॉ. लक्ष्मण आसबे यांनी मनोगते व्यक्त केली.यावेळी अंकिता पाटील ठाकरे, राजवर्धन पाटील, बाबुराव रणवरे, अनिल पाटील, दत्तू सवासे, दत्तात्रय शिर्के, प्रतापराव पाटील, प्रकाश मोहिते, संजय बोडके, राजेंद्र देवकर, अमरदीप काळकुटे, विजय घोगरे, सुभाष गायकवाड, उमेश पाटील, विक्रम कोरटकर, आनंदराव बोंद्रे, शरद जामदार, रामचंद्र नाईक, राहुल कांबळे, संगिता पोळ, सरपंच पल्लवी गिरमे, निवृत्ती शिंदे, चंद्रकांत भोसले, किरण पाटील, भागवत गोरे, जयकुमार कारंडे आदीसह पदाधिकारी, कार्यकर्ते, ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन कार्यालयीन अधीक्षक सुभाष घोगरे तर आभार अँड.कृष्णाजी यादव यांनी मानले.









