औरंगाबाद : कृषि विज्ञान केंद्रात 1 सप्टेंबर रोजी 78 व्या शेतकरी शास्त्रज्ञ मंच कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात कृषी शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मोसंबी संशोधन केंद्र, बदनापुर येथील प्रभारी अधिकारी डॉ. संजय पाटील व एनएआरपी, औरंगाबाद येथील सहयोगी प्राध्यापक डॉ. सी.बी. पाटील यांची उपस्थिती होती. तसेच या कार्यक्रमामध्ये केव्हीकेचे कार्यक्रम केव्हीकेचे शास्त्रज्ञ डॉ. बस्वराज पिसुरे, केव्हीकेचे कर्मचारी व्ही.एस. पतंगे, शिवा काजळे तसेच कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते.
या कार्यक्रमामध्ये मोसंबीतील फळगळ व्यवस्थापन या विषयावर बोलतांना डॉ. संजय पाटील म्हणाले, औरंगाबाद जिल्हयामध्ये प्रमुख पिकांपैकी मोसंबी हे एक पिक आहे. सद्यस्थितीमध्ये मोसंबी पिकामध्ये वातावरणातील आकस्मिक बदल व त्यामुळे होणाऱ्या बुरशीजन्य रोगांमुळे फळ गळती दिसून येत आहे. यामध्ये सतत रिमझीम पडणारा पाऊस आणि सूर्यप्रकाश न मिळाल्यामुळे प्रकाश संश्लेषन क्रिया कमी होऊन अन्न संचय कमी होणे हेही फळगळीचे कारण असल्याचे त्यांनी सांगितले. मोसंबी पिकामध्ये बुरशीजन्य रोग जसे की, फायटोप्थोरा, अल्टरनेरीया, डिप्लोडीया आदी बुरशीमुळे तयार होवून मोसंबी फळांची देठ व साल काळपट पडून तपकीरी डाग तयार होतात. यामध्ये जुन्या वाळलेल्या फांदया जर झाडाला असतील तर त्यामध्ये या बुरशीजन्य रोगाचे मोठया प्रमाणात वाढ होवून त्यालगत फांदीवरील फळे एका बाजुस करपून गळून पडतात.पाणी देतांना खोडाजवळ पाणी साचणार नाही यांची काळजी घ्यावी, गळलेली फळे बागेबाहेर खोल खडडयात गाडावीत, बागेच्या उताराच्या बाजूने शेतातील पाणी बाहेर काढून द्यावे, झाडांच्या वाढीनुसार अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन करावे तसेच बुरशीजन्य फळगळीच्या नियंत्रनासाठी 6 टक्के बोर्डो मिश्रण किंवा कॉपर ऑक्झीक्लोराईड (50 डब्लूपी) 2.5 ग्रॅम किंवा अझोक्सिस्ट्रोबीन, डायफेनकोनॅझोल 10 मीली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी असे त्यांनी सांगितले.
यावेळी रब्बी, ज्वारी व करडई लागवड तंत्रज्ञान या विषयावर मार्गदर्शन करतांना डॉ. सी. बी. पाटील म्हणाले की, शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांची काढणी करताच रब्बी हंगामासाठी तयार असणे गरजेचे आहे. रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांना व नामकृवि,परभणी विद्यापीठाने शिफारस केलेल्या परभणी मोती व परभणी सुपरमोती या रब्बी ज्वारी पीकाच्या तर परभणी कुसुम, पुर्णा (पीबीएनएस 86) , मफुकृवि, राहुरी यांची फुले कुसुमा या करडई पीकाच्या हमखास उत्पन्न देणाऱ्या वाणांची लागवड करावी. रब्बी ज्वारी पीकाकरीता शेतकऱ्यांनी मध्यम ते भारी व पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी, पेरणी ही ऑक्टोबरच्या पहील्या पंधरवाडयातच करावी, यासाठी बियाणे हेक्टरी 10 किलो वापरावे तसेच पेरणीपुर्वी बियाण्यांना बिजप्रक्रिया करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. रब्बी हंगामातील करडई लागवड वर बोलतांना त्यांनी वरील शिफारशीत वाणांचा उल्लेख करत करडई पीकांमध्ये हरभरा, करडई, गहू, करडई यांचे प्रत्येकी 3ः1 किंवा 2ः1 तसेच जवस, करडई करीता 3ः1 किंवा 4ः2 प्रमाणात आंतरपीक घेण्याची शिफारस केलेली आहे. याकरीता जिरायती करडई लागवड 15 सप्टेंबर पासुन ते 15 ऑक्टरोंबर तर बागायती लागवड 15 ऑक्टोंबर पासुन ते 15 नोव्हेंबरपर्यंत करता येते.