नाशिक : थकलेले वेतन मिळावे यासह इतर मागण्यांसाठी ‘सिटीलिंक’च्या वाहकांनी आज अचानक काम बंद आंदोलन पुकारले. त्यामुळे ऐन सणासुदीत प्रवाशांचे चांगलेच हाल झाले. नाशिक महानगर परिवहन मंडळाच्या वतीने सिटीलिंक ही सार्वजनिक शहर बससेवा सुरू करण्यात आलेली आहे. ही बससेवा खासगी कंत्राटदारांच्या माध्यमातून चालवली जाते. कंत्राटदाराने बससेवेसाठी कंत्राटी पद्धतीने अनेक वाहक व चालकांची भरती केली. मात्र, या कर्मचार्यांना वेळेवर वेतन मिळत नाही. 3 महिन्यांपासून वेतन थकित आहे. याबाबत वारंवार तक्रारी करूनही याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप करत वाहकांनी कामबंद आंदोलन पुकारले.
थकीत वेतनासह वाहकांनी इतरही मागण्या केल्या आहेत. यात तीन ते चार महिने पगार न होणे, कामाच्या वेळेबाबत सुसूत्रता नसणे, जाचक अटी अशा कारणांमुळे आंदोलन पुकारल्याचे कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले. सिटीलिंकच्या तपोवन आणि नाशिकरोड डेपोमधून गुरुवारी सकाळपासून एकही बस रवाना झालेली नव्हती. त्यामुळे शहरात अचानक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन पुकारल्याने शहरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कोलमडली होती. सकाळी सहा वाजेपासून सुरु झालेले या आदोलन जोपर्यत तोडगा निघत नाही तोपर्यन्त सुरूच राहणार असल्याचे सागत सकाळी दहा वाजेपर्यंत सुरु होते. उपमहाव्यवस्थापक मिलिंद बंड यांनी या कर्मचार्यांशी चर्चा केल्यानंतर तीन दिवसासाठी हे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. मोठा गाजावाजा करत दोन वर्षांपूर्वी नाशिक महानगरपालिका वाहतूक मंडळाच्या वतीने खासगी ठेकेदारांच्या माध्यमातून ‘सिटीलिंक’ सार्वजनिक शहर बससेवा सुरू करण्यात आली. त्यात ठेकेदाराने कंत्राटी पद्धतीने शेकडो चालक, वाहक, कर्मचारी यांची भरती केली. मागील 3 महिन्यांपासून या कर्मचार्यांचे पगारच झालेले नसल्याने आंदोलनाचा पवित्र घ्यावा लागल्याचे कर्मचार्यांकडून सांगण्यात आले.