अकोला : जिल्ह्यातील सर्वात मोठ्या काटेपूर्णा प्रकल्पात 83.10 दलघमी (96.24 टक्के) जलसाठा उपलब्ध झाला आहे. जलसंचय पातळीच्या नियमानुसार 15 सप्टेंबर पर्यंत 98 टक्के जलसाठा ठेवता येतो. परिणामी प्रकल्पातील जलसाठा 98 टक्क्यांपेक्षा अधिक झाल्यास प्रकल्पाचे दरवाजे उघडले जातील, अशी माहिती पाटबंधारे विभागाच्या सुत्रांनी दिली. जिल्ह्यात काटेपूर्णा आणि वान हे दोन मोठे प्रकल्प आहेत. काटेपूर्णा प्रकल्पाची साठवण क्षमता ८६.३५ दशलक्ष घनमिटर आहे. पाणी संजय पातळीनुसार 31 ऑगस्ट पर्यंत 95 टक्के जलसाठा ठेवता येतो. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात ज्या-ज्या वेळी 95 टक्क्यांपेक्षा अधिक जलसाठा उपलब्ध झाला. त्या-त्यावेळी प्रकल्पाचे दरवाजे उघडावे लागले.
आता पर्यंत दहाही दरवाजे उघडावे लागले आहेत. आता नियमानुसार 15 सप्टेंबर पर्यंत 98 टक्के जलसाठा ठेवावा लागतो. 15 सप्टेंबर पूर्वी 98 टक्क्यांपेक्षा अधिक जलसाठा उपलब्ध झाल्यास प्रकल्पाचे दरवाजे उघडावे लागणार आहेत. हवामान खात्याने विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे जोरदार पाऊस झाल्यासही प्रकल्पाचे दरवाजे उघडले जातील. याच बरोबर जिल्ह्यातील दुसऱ्या मोठ्या वान प्रकल्पाची साठवण क्षमता 81.15 दशलक्ष घनमिटर आहे. 61.60 दशलक्ष घनमिटर (75.17 टक्के) जलसाठा उपलब्ध झाला आहे. तसेच मोर्णा, निर्गुणा, उमा या मध्यम प्रकल्पात 100 टक्के जलसाठा उपलब्ध झाला असून मोर्णा आणि उमा प्रकल्पाच्या सांडव्यावरुन अद्याप विसर्ग सुरु आहे. जिल्ह्यात एक जुन पासून आता पर्यंत सर्वाधिक पावसाची नोंद ही वान पाणलोट क्षेत्रात झाली आहे. वान प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात आता पर्यंत 877 मिलिमिटर पावसाची नोंद झाली आहे. तर काटेपूर्णा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात 488 मिलिमिटर, मोर्णा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात 762 मिलिमिटर, निर्गुणा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात 145 मिलिमिटर तर उमा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात 270 मिलिमिटर पावसाची नोंद झाली आहे.


