सोनेराव गायकवाड
जिल्हा प्रतिनिधी,लातूर
लातूर दि.०१- ऊस तोडणीसाठी आलेल्या मांजरा कारखान्याच्या सर्व संबंधितांनी संगनमत करून शेतकऱ्यांच्या ४९ टन ऊसाची चोरी केली असून मांजरा परिवारातील कारभाराचा नवा पॅटर्न यातून उघडकीस आला आहे. चोरीच्या या प्रकरणी चेअरमन, कार्यकारी संचालक यांच्यासह सर्व संबंधीताविरूध्द गुन्हे दाखल करावेत अशी मागणी कारखान्याचे शेतकरी सभासद भाजपाचे नेते राजेश कराड यांनी केली आहे. गेल्या १८-२० महिन्यापासून शेतात ऊस उभा असल्याने शेतकऱ्यांची मोठया प्रमाणात आडवणूक, पिळवणूक आणि छळवणूक होत असताना मांजरा परिवारातील साखर सम्राट मात्र लावणीच्या फडात दंग असल्याने शेतकरी मोठा असंतोष व्यक्त करत आहेत.
मांजरा साखर कारखान्याचे रामेश्वर येथील शेतकरी सभासद हनुमंत तुळशीराम कराड यांचा ऊस कारखान्याच्या तोडणी कार्यक्रमानुसार ऊस तोडणी यंत्राद्वारे तोडण्यात आला. सदरील ऊसाच्या वजनाची माहिती घेण्याचा प्रयत्न केला मात्र अधिकृत मिळाली नाही. आठ दिवसांनी ऊसाची रक्कम खात्यावर जमा झाल्यानंतर संशय आल्याने चौकशी केली असता वाहतूक ठेकेदार कालिदास शिंदे यांनी आपल्या वडीलांच्या नावे ४९ टन कारखान्याला ऊस दिला. ऊसाच्या ट्रीपची चोरी झाल्याचे निष्पन्न झाल्याने शुक्रवारी सकाळी मौजे रामेश्वर येथे राजेश कराड यांच्यासह असंख्य शेतकऱ्यांनी मांजरा कारखान्याचे काटगाव गटातील गटप्रमुख घोडके, कर्मचारी शेख नजीर, लोमटे आणि वाहतूक ठेकेदार कालिदास शिंदे यांना विचारणा करण्यासाठी बोलावून घेतले असता त्यांच्या चौकशीतून चोरीचा प्रकार उघडकीस आला. रामेश्वर येथील पोलीस पाटील शरद पाटील यांच्या मार्फत संबंधीत कर्मचाऱ्यांना पोलीस उपनिरिक्षक अशोक घाटगे व त्यांच्या सहकाऱ्यांकडे सुपूर्द केले. सदर प्रकरणी शेतकऱ्याच्या ऊसाची संगनमताने चोरी करणाऱ्या सर्व संबंधीत अधिकारी, कर्मचारी, ठेकेदार यांच्या विरूध्द गातेगाव पोलीस ठाण्यात शेतकरी हनुमंत तुळशीराम कराड यांनी तक्रारी अर्ज देवून गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.शेतकऱ्याच्या ऊसाची चोरी केवळ वाहतूकदार अथवा स्लीप बॉयने केली नसून कारखान्याच्या सर्व संबंधीतांची ही साखळी आहे. यातून शेतकऱ्याना लूटण्याचा प्रकार केला जात आहे असे सांगून पत्रकारांशी बोलताना राजेश कराड म्हणाले की, ऊस तोडणी कार्यक्रमात नाव नसताना अथवा कारखान्याचा ऊस तोडणी कोड नसताना मेघराज शिंदे यांच्या नावे कारखान्याने ऊस घेतलाच कसा असा प्रश्न उपस्थित करून संबंधीच्या खात्यावर ऊसाचे बील जमा होईपर्यंत कोणालाच थांगपत्ता लागत नाही याचाच अर्थ कारखान्याचे चेअरमन, संचालक मंडळ, कार्यकारी संचालक, संबंधीत अधिकारी, कर्मचारी हे सर्वच दोषी आहेत.
शेतकऱ्यांनी कर्मचाऱ्यांना बसवून ठेवल्यानंतर मांजरा कारखान्याचे चेअरमन, कार्यकारी संचालक व इतर वरिष्ठांना घटनेची माहिती देण्यासाठी संपर्क करण्याचा प्रयत्न केला पंरतू कोणीही उपलब्ध होवू शकले नाहीत. व्हाईस चेअरमन श्रीशैल्य उटगे यांच्याशी संपर्क झाला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देवून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला. मांजरा परिवारातील पारदर्शक कारभार हाच का असा प्रश्न उपस्थित करून राजेश कराड म्हणाले की, याप्रकरणी संगनमत करून शेतकऱ्यांच्या ऊसाची चोरी करणाऱ्या सर्व संबंधीताविरूध्द कठोर कार्यवाही करावी आजपर्यंत अशाच प्रकारे अनेक शेतकऱ्यांच्या ऊसाची चोरी झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे याबाबत गंभिरपणे दखल घेवून सखोल चौकशी करून दोषी विरूध्द कार्यवाही करावी व शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी साखर आयुक्त, साखर उपसंचालक, जिल्हाधिकारी, जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे केली आहे.
कारखाना प्रशासनाला शेतकऱ्याबद्दल कसलीच आस्था नाही. गेल्या १८-२० महिन्यापासून शेतात ऊस उभा असल्याने शेतकरी चिंताग्रस्त असून ऊसाच्या तोडणीसाठी अडवणूक आणि पिळवणूक केली जात आहे. स्वतःला सहकार महर्षी समजणाऱ्यांनी आतातरी जागे होवून शेतकऱ्यांची होणारी लूट थांबवावी. कष्टाने घामाने पिकवलेल्या ऊसाचा मोबदला द्यावा अशीही मागणी राजेश कराड यांनी केली आहे.
मांजरा परिवारातील कारखान्याच्या कारभारातून शेतकऱ्यांच्या ऊस चोरीचा नवा पॅटर्न उघडकीस आला असून अतिरिक्त ऊसाच्या प्रश्नी, उन्हाळयात पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने उभ्या ऊसाचे वजन घटले जात आहे याचा कसलाच विचार केला जात नाही. शेतकरी हवालदिल असताना मांजरा परिवारातील साखर सम्राट मात्र लावणी महोत्सवाचे आयोजन करून कोटयावधीची उधळपट्टी करून लावणीच्या कार्यक्रमात दंग होत आहेत. यामुळे संकटात, अडचणीत सापडलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यातून तीव्र असंतोष निर्माण होत आहे.