अकोला, दि.९- ऑक्टोबर महिन्यातील दुसरा शुक्रवार हा जागतिक अंडी दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त पशुसंवर्धन विभागातर्फे जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. लोकसंख्येची प्रथिनाची गरज भागविण्याची क्षमता अंड्यात असल्याने जनसामान्यांमधे ‘आहारामधील अंड्याचे पोषण मूल्य’ या विषयी पशुसंवर्धन विभागतर्फे जनजागृती करण्यात आली.
यानिमित्त वाशिम रोड मदरसा येथे साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. तुषार बावने, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. दळवी, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉ.राठोड, डॉ. धुळे, पशुधन विकास अधिकारी डॉ. अहमद यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात 100 मुलांना अंडी वाटप करून त्यांना अंड्याचे महत्व विषद करण्यात आले.
यावेळी माहिती देण्यात आली की, अंड्याचा जैविक गुणांक (Biological Value) हा मातेच्या दुधानंतर दुसऱ्या क्रमांकावर असल्यामुळे अंड्यातील प्रथिने हे पचनासाठी उत्तम व दर्जेदार समजले जातात. अंडे नैसर्गिकरित्या बंद केलेले असते त्यामुळे त्यात भेसळ होऊ शकत नाही.
अंड्यामधे अ – जिवनसत्व व कॅरोटीनॉईड असते जे चांगल्या दृष्टीसाठी उपयुक्त आहे. तसेच अंड्यात ड- जीवनसत्व व कॉल्शिअम असते, जे मजबुत दात व हाडासाठी उपयुक्त आहे. अंड्यामधील ई- जिवनसत्व हे चमकदार व सुंदर त्वचेसाठी आवश्यक आहे. अंड्यामध्ये आढळणारे लुटीन आणि झेॲक्झाँथिन हे मोतीबिंदूचा व वयामुळे स्नायूंत येणारी शिथिलता यांचे प्रमाण खूप कमी करते. अंडयामध्ये सात प्रकारच्या ऑक्सिडीकरण प्रतिबंधक घटकांचा एकत्रित साठा असतो, ज्यामुळे अकाली वृद्धत्व, ऑक्सिडीकरण, रक्तवाहिन्यांतील अडथळे, हाडे ठिसूळ होणे, हदयाच्या वाहिन्यांचे विकार यांना प्रतिबंध होतो. स्मरणशक्तीचा ऱ्हास आणि मेंदूतील विशिष्ट दोष यांमुळे किमान पातळीवर रोखले जातात.
प्रसूती काळात गर्भाशयात असणाऱ्या बाळाच्या मेंदूच्या विकासासाठी अंड्या मधे असलेल्या कोलीन हा घटक महत्वाची भूमिका बजावतो.
अंडे हे विविध उपयोगी अंत्यत स्वस्तात मिळणारा अन्न पदार्थ आहे. तो असंख्य पद्धतीने मजेदार चविष्ट प्रकार बनवून अत्यंत आनंददायीपणे आहारात वापरता येतो. या कार्यक्रमाला परिसरातील नागरिक उपस्थित होते.