अजिंक्य मेडशीकर
तालुका प्रतिनिधी मालेगाव
मालेगाव : तालुक्यात निराधारांचे अनुदान सुरू करण्यापासून ते शासनाच्या विविध योजने अंतर्गत प्रस्तावाला मंजुरात मिळवून देण्यासाठी दलालांची टोळी सक्रिय असल्याची चर्चा आहे.गोरगरिबांना लुटणाऱ्या टोळी विरोधात वंचितच्या विशाल तायडे यांनी एल्गार पुकारला असून त्यांनी निराधार योजना ,जॉब कार्ड, श्रम कार्ड विविध योजनाचे प्रस्ताव तयार करण्यासाठी निःशुल्क उपक्रम सुरू केला आहे.मेडशी येथे कित्येक वर्षांपासून गोरगरिबांची विविध योजने अंतर्गत अनुदान मंजुरीसाठी दलालाकडून लुबाडणूक होत असल्याची चर्चा जोरात आहे. निराधारांचे विविध योजने अंतर्गत अनुदान मंजुरीसाठी लाभार्थ्याकडून आठ ते दहा हजार रुपये जात आहेत. शासनाच्या तिजोरीला चुना लावण्यात येऊन बोगस लाभार्थी मलिदा खात असल्याचा आरोप होत आहे. गोरगरिबांच्या अज्ञानाचा फायदा घेतल्या जात असून त्यांची पिळवणूक केली जात आहे. गोरगरिबांना लुटण्यासाठी गावपातळीपासून ते मालेगाव स्तरावर दलालांची टोळी सक्रिय असल्याची माहिती मिळत आहे.दलालांच्या टोळीला टक्कर देण्यासाठी वंचित बहुजन आधाडीचे शहराध्यक्ष विशाल तायडे यांनी दंड थोपटले आहे. गावातील गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. विविध योजने अंतर्गत निराधारांच्या अनुदान मजुरातीचे प्रस्ताव, कामगारांना श्रम कार्ड आणि मजुरांना जॉब कार्ड मिळवून देण्यासाठी मेडशी येथील वंचित बहुजन आघाडी पुढे सरसावली असून शहराध्यक्ष विशाल तायडे यांनी मेडशी गावासाठी निशुल्क सेवा सुरू केली आहे.तरी गरजूनी निःशुल्क उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन विशाल तायडे यांनी केले आहे.