पवन मनवर
तालुका प्रतिनीधी यवतमाळ
यवतमाळ: शेती करताना शेतकऱ्याला बेमोसमी पाऊस, ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ, बाजारपेठेतील बाजारभावात होणारी घसरण, शेतीसाठी सावकाराकडून किंवा बँक इ. कडून घेतलेले कर्ज परतफेडीची मुदत, निर्यातीतील होणारे शासकीय बदल अशा अचानक येणाऱ्या अनेक संकटांचा सामना करावा लागतो, हवामानात अचानक होणाऱ्या बदलांमुळे शेतातील पिकांचे नुकसान होते. हजारो रुपये खर्च करून शेतकरी आपला शेतमाल तयार करतो त्याची काळजी घेतो. पण त्याच्या कष्टाला दरवेळी फळ मिळतेच असे नाही.अशातच सततची नापिकी, वाढणारा कर्जाचा बोज्यातून शेतकरी टोकाचे पाऊल उचलत आहे. यंदा कमी पाउस झाल्याने शेतातील पिकांमधुन मिळणाऱ्या उत्पन्नात घाट झाल्याने विषारी द्रव्य प्राशन करून शेतकऱ्याने जीवन संपविल्याची घटना यवतमाळच्या दिग्रस तालुक्यातील मोख येथे घडली आहे.यवतमाळच्या दिग्रस तालुक्यातील मोख येथील रहिवाशी बाळू चव्हाण असे शेतकऱ्याचे नाव आहे. बाळू चव्हाण यांनी शेतीसाठी दिड लाख रुपयांचे बॅकेचे कर्ज काढले होते. यात यंदा पाऊस (Rain) कमी झाल्याने अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. यामुळे यंदा कापूस आणि सोयाबीन उत्पादनात पन्नास टक्के घट झाल्याने बाळू चव्हाण हे चिंतेत होते. याच चिंतेतून मोख इथे शेतकऱ्याने स्वतःच्या शेतात विषारी औषध प्राशन करून जीवन संपविले.सततच्या नापिकीला आणि अंगावर असलेल्या कर्जाची परतफेड कशी करायची या चिंतेतून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली आहे. त्यांच्या आत्महत्येमुळे तीन लहान मुले अनाथ झाली आहेत. दोन लहान मुलं, एक मुलगी, पत्नी आणि आई- वडील असा मृतकच्या पाठीमागे परिवार आहे.