पवन मनवर
तालुका प्रतिनिधी यवतमाळ
यवतमाळ:नागपूर-तुळजापूर महामार्गावरील मांगुळ (ता. यवतमाळ) येथे जंगलात दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या नऊ जणांना पोलिसांनी जेरबंद केले. ही कारवाई आर्णी पोलिसांनी केली. या कारवाईने खळबळ उडाली आहे.मांगुळ येथील मारुती देवस्थानातील महाराज व दोन इसमांनी उत्खनन करून सोने काढल्याची चर्चा परिसरात आहे. त्यांच्यात वाद होऊन खून होण्याची शक्यता असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पंच व पोलीस घटनास्थळी पोहचले तेव्हा मंदिराजवळच्या समोरील दारावर काही दुचाकी उभ्या होत्या. बाजूला अंधारात काही व्यक्ती घोळका करून दबा धरून बसले होते. पोलिसांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा चार जणांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला.पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून काही अंतरावर त्यांना पकडले. त्यांची अंगझडती घेतली असता दोन चाकू, एक कुकरी, मिरची पावडर पाकिटे, दोरी असे साहित्य आढळले. त्यावरून आरोपी बालाजी ऊर्फ कालभैरव ऊर्फ महाकाल ऊर्फ शनी महाराज श्रीपती तिळेवाड याला विचारपूस केली असता त्याने, मंदिर परिसरात खोदकाम करताना मोठ्या प्रमाणात सोने सापडल्याचा संशय होता असे सांगितले. त्यावरून मंदिराचा पुजारी शामराव सातपुते व सोबत असलेली अनुसया केंद्रे यांना बांधून मारहाण केली.सोने व देणगी स्वरूपात मिळालेले पैसे लुटण्याकरिता त्याने इतर साथीदारांना बोलावले. मात्र पोलिसांनी त्यांचा हा डाव उधळून लावला. आरोपींकडून पाच दुचाकी, आठ मोबाइल, दोन चाकू, एक कटधार, रस्सी, मिरची पावडरच्या पाच पुड्या व रोख रक्कम, असा एकूण तीन लाख ५९ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस उपनिरीक्षक चंदन वानखडे यांच्या तक्रारीवरून आर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात येऊन आरोपींना अटक करण्यात आली.