महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधी भद्रावती
भद्रावती,दि.१९:-अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज मोझरी द्वारे घेण्यात येणाऱ्या ग्रामगीता जीवन विकास परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या येथील लोकमान्य विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचे विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवून सर्वगुणसंपन्न विद्यार्थी तयार करणे,विद्यार्थ्यांमध्ये संस्कार मूल्य रुजवून सुसंस्कारित करणे या हेतूने ही परीक्षा आयोजित केली जाते. या परीक्षेसाठी येथील लोकमान्य विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील २५१ विद्यार्थी बसले होते. सर्वच विद्यार्थ्यांनी ही परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण केली. त्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. ही परीक्षा तालुक्यातील अनेक केंद्रांवर घेण्यात आली. त्यात विविध शाळांचे हजारो विद्यार्थी सहभागी झाले होते.प्रमाणपत्र वितरण प्रसंगी लोकसेवा मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत गुंडावार, माजी प्राचार्य गोपालराव ठेंगणे, उपप्राचार्य रुपचंद धारणे, पर्यवेक्षक प्रफुल्ल वटे, ग्रामगीता जीवन विकास परीक्षा तालुका प्रमुख विशाल गावंडे, रवींद्र नंदनवार, प्रतीक नारळे, राजेश्वर मामिडवार, कु. प्रतीक्षा खुजे आणि इतर शिक्षक उपस्थित होते.

