पुणे : विसर्जन मिरवणुकीत ध्वनीपातळीची मर्यादा ओलांडणारी मंडळे तसेच साउंड यंत्रणा (डीजे) पुरवठादारांविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग, ध्वनिप्रदूषण केल्याप्रकरणी आठ खटले दाखल केले आहेत. एकीकडे डीजे, दुसरीकडे लेझर लाइट. मग कानावर हात आणि डोळे बंद करून उत्सवात सहभागी व्हायचे का? असा प्रश्न येत्या काही वर्षांत सर्वसामान्यांपुढे उभा राहणार आहे. पुणे पोलिसांनी येरवडा, हडपसर, वानवडी, विमानतळ, चंदननगर, कोथरूड भागातील मंडळे आणि डीजेवाल्यांविरुद्ध आठ गुन्हे दाखल केले आहेत. विसर्जन सोहळ्यात विविध मार्गांवरील सुमारे 70 ते 80 खटले ध्वनिमर्यादा तपासण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे पाठविण्यात आले आहेत. याबाबतचा अहवाल मिळाल्यानंतर संबंधित मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, अशी माहिती विशेष शाखेचे उपायुक्त आर. राजा यांनी दिली.
विसर्जन मिरवणूक तसेच उत्सवाच्या कालावधीत उच्चक्षमतेची साउंड सिस्टिम वापरल्याने नागरिकांना त्रास झाला होता. याबाबत सामान्य नागरिक तसेच विविध राजकीय पक्षकार्यकर्त्यांनी ध्वनिप्रदूषण करणार्या मंडळांवर नाराजी व्यक्त केली होती. ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी कडक उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी याबाबत गांभीर्याने दखल घेत ही कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. यंदा डीजेवाल्यांनी रात्रीच्या वेळी लेझर लाइटचा मोठा वापर केला. नियमानुसार या लाउटना बंदी आहे. असे असतानादेखील ते वापरले गेले. त्यामुळे अनेकांच्या डोळ्यांना गंभीर इजा झाल्याचे समोर आले आहे. निवासी क्षेत्रात सकाळी सहा ते रात्री दहापर्यंत 55 डेसिबल आणि रात्री दहा ते सकाळी सहा या वेळेत 45 डेसिबल अशी ध्वनिमर्यादा केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने निश्चित केली आहे. विसर्जन मिरवणुकीत सुमारे 130 डेसिबलची मर्यादा ओलांडण्यात आली होती. त्यामुळे सामान्यांना मोठा त्रास सहन करावा लागला होता. 2018 मध्ये गणेशोत्सवात ध्वनिप्रदूषणाचे 64 गुन्हे दाखल करण्यात आले होते. 2019 मध्ये ध्वनिप्रदूषण केल्याप्रकरणी 16 गुन्हे दाखल करण्यात आले होते.


